Tuesday, 26 February 2019

कमळगड किल्ला

कमळगड किल्ला Kamalgad Fort – ४२०० फूट उंचीचा हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे.
सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर डोंगररांगेतील हा किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने मध्यम समजला जातो.

महाबळेश्वराच्या डोंगररांगनी अनेक ऐतिहासिक गड अलंकारासारखे धारण केले आहेत. धोम धारणाच्या जलाशयात मागील बाजूने एक डोंगररांग पुढे आलेली दिसते. दोन्ही अंगानी पाण्याचा वेढा असलेल्या या पर्वतराजीत हे एक अनोखे पाषाणपुष्प वर आले आहे. दक्षिणेकडे कृष्णानदीचे खोरे आणि उत्तरेकडे वाळकी नदीचे खोरे यांच्या मधोमध हा दिमाखदार किल्ला उभा आहे.

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे : पंधरा वीस मिनिटांच्या भ्रमंती नंतर गडाच्या निकट आपण पोहचतो. वर जाताच गडमाथ्याच्या सपाटीवर प्रवेश होतो आणि आजुबाजूचा डोंगरदऱ्यांचा सुंदर मुलूख आपल्या दृष्टीपथात येतो. एरवी आढळणारे किल्ल्यांवरील प्रवेशद्वार, बुरूज असे काहीच येथे आढळत नाहीत. गडाला जोडून येणारी एक डोंगर रांग लक्ष वेधून घेते. तिला नवरानवरी चे डोंगर म्हणतात. पुढे जमीन खोल चिरत गेलेले ४०-५० फूटलांबीचे एक रुंद भुयार दिसते. त्याला आत उतरायला मजबूत पायऱ्याही आहेत. हीच ती गेरूची किंवा कावेची विहीर, उंच अशा या ५०-५५ पायऱ्या उतरत जाताना आपण डोंगराच्या पोटात जात असल्यासारखे भासते. हवेतील थंडावाही वाढत जातो. तळाशी पोहचल्यावर चहुबाजूला खोल कपारी असून सर्वत्र गेरू किंवा कीव याची ओलसर लाल रंगाची माती दिसते गडावर दक्षिणेकडे कातळाची नैसर्गिक भिंत तयार झाली आहे. तिच्यावर बुरुजाचे थोडेफार बांधकाम झाले आहे. गडावर कोठेही पाण्याचे टाके नाही. दक्षिणेकडेच गवतात लपलेले चौथऱ्यांचे अवशेष दिसतात. नैऋत्येला केंजळगड, त्याच्या मागे रायरेश्वराचे पठार व पश्चिमेकडे पाचगणी, पूर्वेला धोम धरण अशी रम्य सोयरिक कमळगडाला मिळाली आहे. धोमचे हेमाडपंती शिवमंदिर प्रेक्षणीय आहे. मूळ मंदिर धोम ऋषींच्या वास्तव्याने प्रसिद्ध झाले. थोर संत कवी वामन पंडित यांचीही जवळच भोमगावाला समाधी आहे.

गडावर जाण्याच्या वाटा :कमलगडावर जाण्याचे अनेक मार्ग आहेत. ते सर्वच ट्रेकिंगचा मनमुराद आनंद देणारे आहेत.

१. महाबळेश्वरहून : महाबळेश्वरच्या केट्स पॉईंट वरून खाली येणाऱ्या सोंडेवरून कृष्णा नदीच्या खोऱ्यात उतरले की सुमारे दोन तासांत समोरच्या डोंगर उतारावरील नांदवणे गावी पोहचतो. वस्तीच्या पाठीवरील पहाडावरून तसेच वर गेले की दोन अडीच तासांत कमळगडावर पोहचता येते.

२. वाईहून : वाईहून नांदवणे गावी येण्यास सकाळी ९:३० वाजता एस.टी. बस आहे.

३. उत्तरेकडून : वाळकी नदीच्या खोऱ्यातील असरे, रानोला वासोळे गावीही वाईहून एस.टी. ने येता येते. वासळ्याहून येताना धोम गावापासून सुरू झालेला धोम धरणाचा जलाशय थेट गावापर्यंत साथ देतो. वासोळे गावातून पाणवठ्याच्या दिशेने चढणीस सुरुवात केली असता. आपण साधारण एक ते दीड तासातच माचीजवळ येतो. वासोळे गाव हे डोंगराच्या कुशीत वसलेले निसर्ग सौंदर्याने नटलेले असे सुंदर खेडे आहे. वस्तिच्या पाठीवर उत्तुंग कडा व डोंगरमाथा आहे, दुसऱ्या अंगाला खोलदरी आहे. पुढे गेल्यावर यू टर्न घेऊन पाऊण तासानंतर आपण किल्ल्याच्या मुख्य पहाडावर येतो. डोंगरमाथ्यावरील घनदाट वृक्षांच्या छायेत गोरखनाथ मंदिर दिसते. येथून थोडे पुढे ५-१० मिनिटे चालत गेल्यावर रस्त्याच्या डाव्याबाजूला एक पाण्याचे टाके लागते. पाऊल वाटेने तसेच वर गेले की १५-२० मिनिटांचा घनदाट जंगलाचा छोटा टप्पा लागतो. नंतर मात्र आपण मोकळ्या मैदानावर येतो. येथे धनगरांची वस्ती आहे. याच पठारावरून आपणास कमळगड पूर्णप्णे दृष्टीपथात येतो. वस्तीपासून उजवीकडे गडावर जाण्यची वाट आहे.

गडावर रहाण्याची सोय नाही. माचीवरील गोरखनाथ मंदिरात पाच-सहा राहू शकतात. गडावर जेवणाची सोय नाही. गडावर पाण्याची सोय नाही. गोरकनाथ मंदिराच्या थोडे पुढे छोटे टाके आहे. गडावर जाण्यासाठी नांदवणे मार्गे अडीच तास लागतात.

#कमळगड #किल्ला #Kamalgad #KamalgadFort

चंदन–वंदन किल्ला

चंदन–वंदन किल्ला Chandan-Vandan Fort – ३८०० फुट उंचीचा हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे.
सातारा जिल्ह्यातील सातारा डोंगररांगेतील हा किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने सोपा समजला जातो.

कथा आणि कांदबरी मध्ये जुळ्या भावा विषयी नेहमीच ऐकत असतो मात्र दुर्गविश्वातही अशी जुळी भांवडे आढळतात. त्यांच्यापैकीच एक चंद्न-वंद्न साताऱ्याच्या अलीकडे २४ कि.मी. अंतरावर ही दुर्गजोडी उभी आहे. ऊसाच्या पिकामुळे सधन झालेला हा सर्व परिसर त्यामुळे रस्ते, वीज, एस.टी. या सर्व प्राथमिक सुविधा गावा गावा पर्यंत पोहोचल्या आहेत. सपाट माथा असल्यामुळे पुणे-सातारा मार्गावरून हे किल्ले सहजच ओळखता येतात. यांचा पूर्वेस जरंडेश्वर कल्याणगड, भवानीचा डोंगर, पश्चिमेस वैराट्गड, पांडवगड. एकीकडे महाबळेस्वर प्रांत तर दुसरीकडे सातारा शहर यांच्या सीमेवर हे किल्ले उभे आहेत.

इतिहास : इ.स. ११९१-११९२ सालच्या ताम्रलेखानुसार हे किल्ले शिलाहार राजा दुसरा भोज याने बांधले. १६७३ च्या सुमारास शिवरायांनी सातारा प्रांत जिंकला आणि त्याचवेळी सज्जनगड, कल्याणगड, अजिंक्यतारा या किल्ल्यांसओबत यांना देखील स्वराज्याट सामील करून घेतले. पुढे संभाजी राजांच्या कारकिर्दीत सन १६८५ मधे फेब्रुवारी महिन्यात अमानुल्ला खानाने चंदन-वंदन येथे असणाऱ्या मराठ्यांच्या तुकडीवर हल्ला केला. या चकमकीत मोघलांच्या हातात २५ घोडी, २० बंदुका , २ निशाणे, १ नगारा सापडला. पुढे १६८९ पर्यंत हा सर्व परिसर मराठ्यांच्या ताब्यात होता. नंतर मात्र तो मोगलांच्या हातात पडला. छत्रपती शाहुमराहाराजांनी स्न १७०७ मध्ये पावसाळ्यात हा प्रदेश जिंकून घेतला. पुढे सन १७५२ मध्ये ताराबाईवर लक्ष ठेवण्यास पुरेसा फौजफाटा देऊन बाळाजी विश्वनाथांनी या किल्ल्यावर दादोपंत यांची नेमणूक केली. नंतर हा किल्ला इंग्रजांच्या हातात पडला.

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे : चंदनच्या प्रवेशद्वाराजवळील रस्ता पूर्वी बराच कठिण होता. मात्र सध्या तेथे असलेल्या मशिदीमुळे हा रस्ता बराच रुंद झाला आहे. दोन अर्धवट पडलेले बुरुज आपणास प्रवेशाद्वाराची जाणीव करून देतात. येथून साधारण १५ पायऱ्या पार गेले असता डाव्या बाजूस एक पडकी वास्तू दिसते. तिच्या वरच्या अंगास एक वडाचे झाड आहे. पाच वडांचा मिळून बनलेला असल्यामुळे त्यास ‘पाचवड” म्हणतात. बाजूलाच एक शंकराचे मंदिर आहे. यातील दोन्ही महादेवाच्या पिंडी या पाच लिंगांच्या आहेत. ग्रामस्थांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे. श्रावणात येथे यात्रा असते. ( येथून दहा एक पायऱ्या चढून गेल्यावर समोरच मोठ्या मोठ्या शिळा रचलेल्या दिसतात.) वंदनप्रमाणेच येथेही एक दर्गा आहे. दर्ग्याच्या बाजूस एखाद्या वाड्याच्या भिंतीसारखे आंधकाम आढळते. एका अर्धवट दरवाजासारखे काहीतरी दिसते. साधारण सदरेसारखे येथील बांधकामाचे अवशेष दिसतात. याच्या मागील भागात सुद्धा अनेक उद्ध्वस्त अवशेष आपणास दिसतात. हीच गडावरील मुख्य वस्ती असावी. गडाच्या उत्तर टोकावर मजबूत बांधणीचा अगदी सुस्थितीत असलेला एक बुरूज आढळतो. याच वाटेवर एक समाधी आढळते. याच्या वरील बाजूस अस्पष्ट असे शिवलिंग आहे आणि एका बाजूस आरुतीची मूर्ती आहे. गडाच्या दक्षिणेकडे तीन कोठ्या असलेली पण वरचे छप्पर उडालेली वास्तू आढळते. गावकऱ्यांच्या मते हेकोठार म्हणजे दारूगोळा साठवण्याची जागा होती. गडाच्या मध्यभागी प्रशस्त चौथरा आहे. यावर काय वास्तू होती याचा मात्र अंदाज लागत नाही.

गडावर जाण्याच्या वाटा : चंदन आणि वंदन या दोन्ही किल्ल्यावर जाणाऱ्या सयुंक्त वाटा आहेत. पुणे-सातारा मार्गावर भुईंज गाव आहे. तेथे उतरून २० कि.मी. अंतरावर किकली गाव आहे. वाई-सातारा या दोन्ही ठिकाणाहून किकलीला येण्यासाठी बस आहे. किकलीच्या जवळच बेलमाची नावाचे गाव आहे. या बेलमाची गावाचे दोन भाग आहेत. एक आहे ती खालची बेलमाची तर दुसरी वरची बेलमाची. येथूनच एक वाट चंदन आणि वंदन यांच्या खिंडीत पोहोचते. डावीकडे राहतो तो चंदन तर उजवीकडे वंदन. या चंदन किल्ल्यावर जाण्यासाठी दोन वाटा आहेत.

दर्गात रहायचे असल्यास ३०-४० जणांना राहता येते. जेवणाची सोय नाही. फक्त पावसाळ्यात पाण्याची सोय होते अन्यथा गडावर पाणी नाही. गडावर जाण्यासाठी अडीच ते ३ तास लागतात.

#चंदन–वंदन #किल्ला #ChandanvandanKilla #ChandanvandanFort

साल्हेर किल्ला

साल्हेर किल्ला Salher Fort – १५६७ मी. उंचीचा हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे.
नाशिक जिल्ह्यातील सेलबारी-डोलबारी डोंगररांगेतील हा किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने सोपा समजला जातो.

महाराष्ट्रात जसा सर्वात उंच शिखराचा मान कळसूबाईचा, तसा गडकिल्ल्यांमध्ये सर्वाधिक उंचीचा मान साल्हेरचा. बागलाण हा मोक्षगंगा आणि अक्षगंगा या नद्यांमुळं समृद्ध झालेला प्रदेश. येथील भूमी तशी सुपिकच त्यामुळे येथील लोकांचे रहाणीमान तसे थोडे उंचावलेले. तरीही डोंगरी भागात कोकण, भिल्ल सारख्या काही आदीवासी जमाती रहातात. साल्हेर गडाचा घेरा साधारणपणे ११ कि.मी. असून व्यापलेले क्षेत्र ६०० हेक्टर आहे.

इतिहास : साल्हेर गड हा परशुरामाची तपोभूमी म्हणून प्रसिद्ध आहे. जिंकलेल्या पृथ्वीचे दान करून स्वतःसाठी भूमी मिळवण्यासाठी सागराला मागे हटवायला त्यांनी बाण सोडला तो याच भूमीवरून असे पौराणीक स्थान असलेल्या साल्हेरचे शिवकालीन इतिहासातील स्थान देखील महत्त्वाचे आहे. ते येथे झालेल्या प्रसिद्ध लढाईमुळे. शिवरायांनी १६७१ मध्ये बागलाण मोहिम काढली आणि साल्हेर जिंकून घेतला. त्या मोहिमेची वार्ता दिल्लीच्या पातशहाला मिळाली. ते ऐकून पातशहा कष्टी झाला. नि म्हणाला,‘काय इलाज करावा, लाख लाख घोड्याचे सुभे रवाना केले ते बुडवले नामोहरम होऊन आले. आता कोण पाठवावे’ तेव्हा पातशहाने ‘शिवाजी जोवर जिंवत तोवर दिल्ली आपण सोडीत नाही’ असा विचार केला आणि इखलासखान व बहोलोलखान यांस बोलावून वीस हजार स्वारांनिशी सालेरीस रवाना केले. मग इखलासखानाने येऊन साल्हेरला वेढा घातला. हे वर्तमान जेव्हा राजांना कळले तेव्हा मोगलाईत पाठवलेले आपले सरनौबत प्रतापरावांना जासूदाकरवी कळविले ‘तुम्ही लष्कर घेऊन सालेरीस जाऊन बलोलखानास धारून चालवीणे आण कोकणातून मोरोपंत पेशव्यांनाही हशमानिशी रवाना केले. ’ हे इकडून येतील तुम्हीही वरघाटी कोकणातून येणे असे दुतर्फा चालून येऊन गनिमास गर्दीस मिळवणे’. अशी पत्रे पाठविली. त्याप्रमाणे एकीकडून प्रतापराव तर दुसरीकडून पेशवे, उभयता सालेरीस आले, आणि मोठे युद्ध झाले. सभासद बखरीत याचा उल्लेख खालीलप्रमाणे आढळतो. “चार प्रहर दिवस युद्ध जाहले मोगल, पठाण, रजपूत, तोफांचे, हत्ती, उंट आराबा घालून युद्ध जाहले. युद्ध होताच पृथ्वीचा धुराळा असा उडाला की, तीन कोश औरस चौरस, आपले व परके लोक माणूस दिसत नव्हते. हत्ती रणास आले दुतर्फा दहा हजार माणूस मुर्दा जाहले पूर वहिले. रक्ताचे चिखल जाहले. त्यामध्ये रुतो लाबले, असा कर्दम जाहला.

मराठ्यांनी इखलासकान आणि बेलोलखानाचा पाडाव केला. युद्धात प्रचंड प्रमाणावर हानी झाली. या युद्धात शिवरायांच्या एक लाख २० हजार सैन्याचा समावेश होता, पैकी १० हजार माणसे कामीस आले. सहा हजार घोड, सहा हजार उंट, सव्वाशे हत्ती तसेच खजिना, जडजवाहीर, कापड अशी अफाट मालमत्ता शिवरायांच्या हाती आली. या युद्धात मावळ्यांनी पराक्रमाची शर्थ केली. मोरोपंत पेशवे आणि प्रतापरव सरनौबत यांनी आणीबाणी केली. सूर्यराव काकडे यांना पराक्रम गाजवतांना आपला देह ठेवावा लागला. ते तोफेचा गोळा लागून पडले. ‘सूर्यराव काही सामान्य योद्धा नव्हे. भारती जैसा कर्ण योद्धा त्याचा प्रतिमेचा, असा शूर पडला.’ विजयाची बातमी शिवरायांकडे गेली राजे खूप खूश झाले. खबर घेऊन आलेल्या जासूदांना सोन्याची कडी आणि प्रतापराव सरनौबत, मोरोपंत पेशवे, आनंदराव, व्यंकोजी पंत यांना अपार बक्षीस आणि द्राव्य देण्यात आले. हा पराभव दिल्लीच्या बादशहाच्या जिव्हारी लागला की सभासद म्हणतो- पातशहा असे कष्टी जाले. ‘खुदाने मुसलमानांची पातशाही दूर करून शिवाजीसच दिधली असे वाटते. आता समोरासमोर लढाई करून तोपर्यंत महाराजांना विजय प्राप्त झाला होता, त्यात साल्हेरचा विजय प्रथम मानावर होता. असा मोठा विजय यापूर्वी कधीही मिळाला नव्हता. या युद्धात महाराजांच्या लोकांनी दाखवलेल्या युद्धकौशल्याची व शौर्याची किर्ती चहुकडे पसरली आणि त्यांचा दरारा अधिकच वाढला. साल्हेर जिंकल्यानंतर त्यासमोरील मुल्हेर किल्ला मराठ्यांनी जिंकला आणि संपूर्ण बागलाण प्रांतावर त्यांनी आपला शह बसवला. त्यामुळे सुरत शहरास कायमची दहशत बसली.

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे :वाघंबे मार्गेगडावर आल्यास उजवीकडे आणि साल्हेरवाडीतून गडावर आल्याश डावीकडे वळल्यास पाच ते दहा मिनिटाच्या अंतरावर काही भग्न पावलेल्या मंदिराचे अवशेष आढळतात. पुढे थोड्याच अंतरावर पाण्याची दोन टाकी असून समोर गंगासागर तलाव दृष्टीस पडतो. तलावाच्या बाजूलाच रेणुका मातेचे आणि गणेशाचे छप्पर नसलेले मंदिर आहे. या मंदिराच्या जवळून दोन वाटा फुटतात. उजवीकडे जाणारी वाट सरळ एका पाण्याच्या टाक्यापाशी घेऊन जाते. टाक्यांसमोरच एक यज्ञवेदी आहे. जवळच एक मूर्तीदेखील आहे. मंदिरापासून वर चढत जाणारी वाट आपल्याला तीन गुहांपाशी घेऊन जाते. गुहांच्या समोर मारूतीचे मंदिर आहे. या गुहांमध्ये रहाता येऊ शकते. गुहांशेजारची वर जाणारी वाट गडाच्या अत्युच्च शिखरावर घेऊन जाते. या शिखरावर श्री परशुरामाचे मंदिर आहे. या उंच गडामाथ्यावर काहीशा ढासळलेल्या अवस्थेत असलेल्या या मंदिरात परशुरामांची मूर्ती व पादुका आहेत, आणि जोडीला भान हरपून टाकणारा निसर्ग. येथून आजूबाजूच्या प्रदेशाचे विहंगम दृश्य नजरेस पडते. येथून संपूर्ण बागलाण विभाग दिसतो. हा गड डांग-गुजरात आणि बागलाण यांना जोडणाऱ्या व्यापारी वाटेवर असल्याने संरक्षण दृष्ट्या महत्वाचा होता. समोर दक्षिण बाजूला अजंठा-सातमाळा डोंगरातले धोडप इखारीया हे सुळके दिसतात. पूर्वेकडे मांगी-तुंगी, तांबोळ्या, न्हावीगड, हनुमान टेकडी, मुल्हेरगड, हरगड, मोरागड आणि सालोटा नजरेस पडतात. समोरच हरणबारीचे धरण लक्ष वेधून घेते.

गडावर जाण्याच्या वाटा : गडावर जाण्यासाठी प्रमुख दोन वाटा आहेत.

वाघांबे मार्गे : साल्हेरला जाण्यासाठी नाशिक-सटाणामार्गे ताहराबाद गाठावे. गुजरातमधून यायचे झाल्यास डांग जिल्ह्यातून ताहराबादला जाण्यास रस्ता आहे. ताहराबादहून मुल्हेरमार्गे वाघंब अशी एस.टी. अथवा जीप सेवा देखील उपलब्ध आहे. वाघंबे गाठल्यावा गावातूनच साल्हेर-सालोटा यांच्या खिंडीतून साल्हेरला जाणारी वाट आहे. वाटेत कुठेही पाणी नसून खिंडीपर्यंत चालणारी वाटचाल दमछाक करणारी आहे. या वाटेने गडावर जाण्यासाठी साधारण अडीच तास लागतात.या वाटेने गडावर जातांना चार दरवाजे लागतात. तिसऱ्या ते चौथ्या दरवाजाच्या दरम्यान कड्यात खोदलेल्या १८ ते२० गुहा आहेत. चौथ्या दरवाजाच्या कमानीवर एक शिलालेख आढळतो. येथून आत आल्यावर समोरच एक पठार दिसते.

साल्हेरवाडी मार्गे : साल्हेरवाडी हे गाव वाघंबे गावाच्या पुढे आहे. साल्हेरवाडीला दोन मार्गांनी जाता येते. एक सटाणा-ताहराबाद-मुल्हर-साल्हेरवाडी असा आहे. साल्हेरवाडीहून गडावर जाणारी वाट दमछाक करणारी आहे. या वाटेने सहा दरवाजे पार करून सुमारे तीन तासांनी आपण गडावर पोहचतो. वाट मळलेली असल्याने चूकण्याची शक्यता नाही. या वाटे कुठेही पाणी नाही.

माळदर मार्गे : गडावर जाण्यासाठी असलेली ही वाट फारशी वापरत नाही. ही वाट माळदर गावातूनच जाते. सटाण्याहून एस.टी.ने माळदरला जाता येते. ही वाट साल्हेर व सालोटा यांच्या दरम्यानच्या खिंडीमधुन जाते. या वाटेने गडावर जायला साधारण तीन तास लागतात.

राहण्याची सोय गडावर असलेल्या तीन गुहांमध्ये रहाण्याची व्यवस्थित होऊ शकते. जेवणाची सोय आपण स्वतःच करावी. गंगासागर तलाव व त्याच्या बाजूला असणारी दोन पाण्याची टाकी यातील पाणी पिण्यास योग्य आहे. गडावर जाण्यासाठी वाघांबे मार्गे अडीच तास, साल्हेरवाडी मार्गे तीन तास, माळदर मार्गे तीन तास लागतात.

#साल्हेर #किल्ला #Salher

वारुगड किल्ला

वारुगड किल्ला Varugad Fort – ३००० फूट उंचीचा हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे.
सातारा जिल्ह्यातील सातारा – फलटण डोंगररांगेतील हा किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने सोपा समजला जातो.

माणागंगा नदी जिथे उगम पावते त्या सीताबाईच्या डोंगरात डाव्या कुशीवर एक किल्ला आहे त्याचे नाव आहे वारुगड. किल्ला माण तालुक्यात दहिवडीच्या ईशान्येस २० मैलांवर आहे.

इतिहास : किल्ला शिवरायांनी बांधला असे सांगतात. या किल्ल्याचा किल्लेदार परभूजातीचा होता. २०० पहारेंकरी व बरीच शिबंदी किल्ल्यावर होती. १८१८ मध्ये साताराच्या राजाच्या फडणीस विठ्ठलपंत याने २०० लोक पाठवून दुसऱ्या बाजीरावपासून घेतला.

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे : किल्ला हा दोन भागात मोडतो. एक गडाची माची तर दुसरा बालेकिल्ला.

१. वारुगड माची : किल्ल्याच्या माचीवर गेल्यावर समजते की गडाचा घेरा केवढा मोठा आहे. किल्ल्याची माची ही संपूर्ण तटबंदी वेष्टीत आहे. आजही ती बऱ्याच मोठ्या प्रमाणावर शाबूत आहे. बालेकिल्ल्यावर जाणारा मार्ग हा या माचीतून पुढे जातो. या माचीत शिरण्यासाठी पूर्वी ५ दरवाजे होते. मात्र सद्य स्थितिला दोनच शिल्लक आहे. गिरवी जाधववाडी या मार्गेमाचीत प्रवेश करणारी वाट एका दरवाजातून वर येते. तर मोंगळ-घोडेवाडी माचीत प्रवेश करणारी वाट दुसऱ्या दरवाजातून वर येते. माचीवर घरांचे, वाड्यांचे अनेक अवशेष आहेत. दोन ते तीन पाण्याचीटाकी, तळी सुद्धा आहेत. मचीवर भैरोबाचे जीर्णोद्धारीत मंदिर सुद्धा आहे. मंदिर प्रशस्त असल्याने येथे राहण्याची सोय होऊ शकते. संपूर्ण माची फिरण्यास दोन तास लागतात.

२. बालेकिल्ला : गिरवी जाधववाडीतुन माचीवर येणारा रस्ता दरवाजातून पुढे गेल्यावर दोन भागात विभातला जातो. उजवीकडे आणि डावीकडे जाणारा रस्ता माचीवरील घोडेवाडीकडे जातो तर सरळ वर जाणारी वाट १५ मिनिटात बालेकिल्ल्याच्या प्रवेशद्वारपाशी येऊन धडकते. दरवाजाची तटबंदी आजही शाबूत आहे. बालेकिल्ल्यावर पोहचल्यावर समोरच एक इमारत आहे. आज ती पूर्णपणे नव्याने बांधून काढलेली आहे. समोरच पाण्याचे टाके व एक विहीर आहे. विहीर बऱ्याच प्रमाणात बुजलेली आहे. किल्ल्यावरून समोरचा परिसर पाहिला की आपल्याला जाणवते की किल्ला किती मोक्याच्या ठिकाणी वसलेला आहे. समोरच दिसणारा सीताबाईचा डोंगर, महादेव डोंगररांग हा परिसर दिसतो. संतोषगडावरून सीताबाईच्या डोंगरातून एक वाट वारुगडावर येते.

गडावर जाण्याच्या वाटा : वारुगडावर जायचे असल्यास फलटण गाठावे. फलटण पासून किल्ल्यावर जाण्यास अनेक मार्ग आहेत. वारुगड मुख्यतः दोन भागात विभागला आहे. एक गडाची माची यावर घोडेवाडी नावाची वस्ती आहे. तर दुसरा वारुगडाचा बालेकिल्ला. बालेकिल्ल्यात जाण्यासाठी माचीतून जावे लागते. माचीत जाण्यासाठी दोन मार्ग आहेत एक गाडीरस्ता आहे जो थेट माचीत जातो तर दुसरा मार्ग म्हणजे पायवाट जी थेट किल्ल्यावर घेऊन जाते.

१. फलटण ते गिरवी : फलटण ते गिरवी अशी एस.टी. सेवा उपलब्ध आहे. गिरवीतून ५ कि.मी. अंतरावर असणारा जाधववाडा गाठावा. जाधववाडा हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे. येथून वारूगड माचीवर जाण्यास २ तास लागतात. माचीतून बालेकिल्ल्यावर जाण्यास २० मिनिटे पुरतात.

२. फलटण दहीवडी : फलटण दहीवडी रस्त्यावर फलटण सोडल्यानंतर २० कि.मी. अंतरावर मोंगळ नावाचा फाटा लागतो. या फाट्यापासून एक कच्चा गाडीरस्ता थेट माचीवरील घोडेवाडी वस्तीत घेऊन जातो. मोंगळ ते घोडेवाडी अंतर १५ कि.मी.चे आहे. फलटण दहीवडी रस्त्यावर फलटण सोडल्यानंतर २६ कि.मी. अंतरावर बीजवाडी नावाचे गाव लागते. या गावातून एक कच्चा गाडीरस्ता थेट माचीवरील घोडेवाडीत जातो. पुढे हा रस्ता वर सांगितलेल्या रस्त्याला येऊन मिळतो.

वारुगडाच्या माचीवर असणाऱ्या भैरवगडाच्या मंदिरात १०० लोकांची सोय होते. जेवणाची सोय आपणच करावी. माचीवर बारामही पिण्याचे पाण्याची टाकी आहे. गडावर जाण्यासाठी जाधववाडीतून दोन तास लागतो. गडावर जाण्यासाठी सर्व ऋतुत जाता येते.

#वारुगड #किल्ला #Varugad

संतोषगड किल्ला

संतोषगड किल्ला Santoshgad Fort – २९०० फूट उंचीचा हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे.
सातारा जिल्ह्यातील सातारा -फलटण डोंगररांगेतील हा किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने सोपा समजला जातो.

सह्याद्रीची मुख्य डोंगररांग प्रतापगडापासून तीन भागांमध्ये विभागली गेलेली आहे. शंभूमहादेव रांग, बामणोली रांग आणि म्हसोबा रांग यापैकी म्हसोबा. डोंगररांगेवर संतोषगड, वारुगड, महिमानगड आणि वर्धनगड हे किल्ले आहेत हा सर्व परिसर तसा कमी पावसाचाच मात्र ऊसाच्या शेतीमुळे सर्व परिसर सधन झालेला आहे. सर्व ठिकाणी वीज, दूरध्वनी अशा आधुनिक सुविधा सुद्धा उपलब्ध आहेत. फलटणच्या माण तालुक्यात असणाऱ्या या किल्ल्यांना पाहण्यासाठी दोन दिवस पुरतात. संतोषगडाला ताथवड्याचा किल्ला असे ही म्हणतात.

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे : आज किल्ल्याचा दरवाजा मात्र केवळ नाममात्रच शिल्लक राहिलेला आहे. दरवाज्यामधील पहारेकऱ्यांचा देवड्या आजही सुस्थितीत आहेत. दरवाज्यातून आत शिरल्यावर समोरच हनुमानाचे टाके आहे. त्याच्याच मागे वाड्यांचे व घरांचे अवशेष आहेत. धान्य कोठारांच्या भिंति उभ्या आहेत पण छप्पर उडालेले आहे. याच्याच मागच्या बाजूला एक मोठा खड्डा आहे. लांबवरून पाहिल्यास एखादी विहीरच वाटते मात्र जवळ गेल्यावर समजते की खाली पाण्याचे टाकं आहे आणि टाक्यात उतरण्यासाठी चक्क कातळभिंतिला भोक पाडून पायऱ्या केलेल्या आहेत. किल्ल्याची पहिल्या टप्प्यावा असणारी संरक्षक तटबंदी, बुरुज आजही चांगल्या परिस्थित उभे आहेत. आजमितिस अनेक किल्ल्यांची तटबंदी ढासळलेल्या आढळतात. पण संतोषगड याला अपवाद आहे. किल्ल्याचा संपूर्ण परिसर भटकण्यास दोन तास पुरतात. किल्ला तसा छोटासाच आहे पण तटबंदी, बरुज असे पाहण्यासारखे बरेच काही आहे. गडावरून फार दूरच्या प्रदेशावर नजर ठेवता येत असे. पश्चिमेस मोळघाट, दक्षिणपूर्व पसरलेली डोंगररांग याच डोंगररांगेवर सीताबाईचा डोंगर व वारूगड आहे.

गडावर जाण्याच्या वाटा : ह्या किल्ल्यावर जाण्यासाठी फलटण आणि सातारा दोन्ही शहरातून जाता येते. ताथवडे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे. ताथवडेला अनेक मार्गांनी पोहचता येते. फलटण ते ताथवडे अशी एस.टी सेवा दर अर्ध्या तासाला उपलब्ध आहे. फलटण ते ताथवडे हे साधारण १९ कि.मी. चे अंतर आहे. साताऱ्याहून पुसेगाव मोळघाटमार्गे फलटणला जाणाऱ्या बसने ताथवडेला उतरता येते. पुसेगाव ते ताथवडे हे साधारण २३कि.मी. चे अंतर आहे. ताथवडे गावातून किल्ल्यावर जाण्यासाठी व्यवस्थित वाट आहे. या वाटेने किल्ल्यावर जाण्यास अर्धा तास लागतो. ताथवडे गावात ‘बालसिद्धचे जीर्णोद्धार’ केलेले मंदिर आहे. मंदिराच्या पायरीवरून सन १७६२ मध्ये किल्ल्याचा जीर्णोद्धार केल्याचे समजते. गड हा तीन भागात विभागला आहे. पहिल्या टप्प्यावर सरंक्षक तटबंदी तर दुसऱ्या टप्प्यावर माचीचा भाग आणि सर्वात वरचा बालेकिल्ल्याचा भाग आहे. किल्ल्यावर जाण्याच्या वाटेवर एक मठ आहे. या मठाच्याच बाजूला एक गुहा आहे. या गुहेत थंड पाण्याचा साठा आहे. एक वाल्मिकी ऋषिंची मूर्ती आहे. मठाच्याच वरच्या बाजूला एक दरवाजा आहे मात्र येथपर्यंत पोहचण्यासाठी वळसा घालून यावे लागते. मठाच्या डाव्या बाजूला जाणारी वाट तटबंदीला चिटकूनच पुढे जाते. पुढे वाटेतच एक छोटेसे देऊळ लागते. येथून वर थोडी उजवीकडे सरकत जाणारी वाट आपल्याला थेट किल्ल्याच्या दरवाज्यातच घेऊन जाते. गड हा तीन भागात विभागला आहे. पहिल्या टप्प्यावर सरंक्षक तटबंदी तर दुसऱ्या टप्प्यावर माचीचा भाग आणि सर्वात वरचा बालेकिल्ल्याचा भाग आहे. किल्ल्यावर जाण्याच्या वाटेवर एकमठ आहे. या मठाच्याच बाजूला एक गुहा आहे. या गुहेत थंड पाण्याचा साठा आहे. एक वाल्मिकी ऋषिंची मूर्ती आहे. मठाच्याच वरच्या बाजूला एक दरवाजा आहे. मात्र येथपर्यंत पोहचण्यासाठी वळसा घालून यावे लागते. मठाच्या डाव्या बाजूला जाणारी वाट तटबंदीला चिटकूनच पुढे जाते. पुढे वाटेतच एक छोटेसे देऊळ लागते. येथून वर थोडी उजवीकडे सरकत जाणारी वाट आपल्याला थेट किल्ल्याच्या दरवाज्यातच घेऊन जाते.

किल्ल्यावर राहण्याची सोय नाही. जेवणाची सोय आपणच करावी. किल्ल्यावर पिण्याचे पाणी नाही.
गडावर जाण्यासाठी ताथवडे गावातून अर्धा तास लागतो.

#संतोषगड #किल्ला #Santoshgad

रत्नदुर्ग भगवतीचा किल्ला

रत्नदुर्ग भगवतीचा किल्ला Ratnadurg Bhagwaticha Fort – हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील कोकण डोंगररांगेतील हा किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने अत्यंत सोपा समजला जातो.

रत्नागिरी शहरापासून अवघ्या २-३ कि.मी. वर असणारा रत्नदुर्ग हा पर्यटकांसाठी मुख्य आकर्षणाचा विषय ठरला आहे. तो त्यावरील अत्यंत सुंदर भगवती मंदिरामुळे, येथून दिसणाऱ्या समुद्राच्या विहंगम दृश्यामुळे आणि समुद्रापर्यंत जाणाऱ्या किल्ल्यातील भुयारी मार्गामुळे रत्नदुर्ग रत्नागिरी शहराच्या अत्यंत जवळ असून अरबी समुद्राच्या काठावरील डोंगरावर बांधण्यात आला आहे. किल्ल्याचा आकार घोड्याच्या नालासारखा असून क्षेत्रफळ १२० एकर आहे. रत्नदुर्ग तीनही बाजूंनी समुद्राने वेढालेला असून याच्या आग्नेय दिशेला जमीन आहे. किल्ल्याच्या पायथ्याशीच मिरकरवाडा हे बंदर आहे.

इतिहास : रत्नदुर्गाची बांधणी फार पूर्वी बहमनी काळात झाली. १६७० साली शिवाजी महाराजांनी हा किल्ला अदिलशहाकडून जिंकून घेतला. धोंडू भास्कर प्रतिनिधी यांनी १७९० साली किल्ल्याची डागडुजी करून याला अधिक मजबुती आणली.

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे : किल्ल्याच्या प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर समोरच सुबक बांधणीचे श्री भगवतीचे शिवकालीन मंदिर आहे. भगवती देवीचे दर्शन घेऊन पुढे गेल्यावर एका ठिकाणी चारही बाजूंनी भिंतींनी संरक्षित केलेली एक जागा आपल्याला दिसते. हाच तो तीन तोंडाचा भुयारी मार्ग. आज हा भुयारी मार्ग वापरात नसला तरी दीपगृहाकडून किल्ल्याच्या प्रवेशद्वाराकडे येतांना लागणाऱ्या तटबंदीवरून या भुयाराचा शेवट खाली समुद्रकिनाऱ्यावर ज्याठिकाणी होतो तेथे असलेली एक प्रचंड गुहा स्पष्ट दिसते. या भिंतीनी संरक्षित केलेल्या तीन तोंडाच्या भुयारी मार्गापासून थोडे पुढे चालत गेले असता समुद्राचे मनोरम दर्शन घडवणारा एक बुरूज लागतो. या बुरुजाचे नाव रेडे बुरूज असून यावर एक स्तंभही उभारला आहे. किल्ल्याच्या एका बाजूला दीपगृह असून या दीपगृहावरून संपुर्ण रत्नागिरी शहराचे तसेच समुद्राचे अत्यंत सुंद्र दृश्य दिसते. किल्ल्यात एक लहान तळे व एक खोल विहीत आहे. रत्नागिरी शहरातून किल्ल्याकडे जाण्यासाठी रिक्षा सोईची असून रत्नागिरी शहराचा नजारा दीपगृहावरून संध्याकाळी ५:०० च्या सुमारास गेल्यास तशी परवानगी मिळू शकते.

गडावर जाण्याच्या वाटा : किल्ल्यावर जाण्यासाठी वरपर्यंत डांबरी रस्ता असून किल्ल्याच्या पायथ्याशीच शंकराचे श्री भागेश्वर मंदिर आहे. या मंदिराच्या खांबांवर पशूपक्ष्यांची सुंदर सुंदर चित्रे कोरलेली असून मंदिराच्या सभोवती नारळी, पोफळी व फुलझाडांनी बहरलेली बाग आहे.

गडावर राहण्याची सोय नाही. जेवणाची सोय नाही. मंदिराजवळ पिण्याचे पाणी मिळू शकते.

#रत्नदुर्ग भगवतीचा #किल्ला #RatnaDurga 

ताहुली किल्ला

ताहुली किल्ला Tahuli Fort – ३४८७ फूट उंचीचा हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे.
ठाणे जिल्ह्यातील माथेरान डोंगररांगेतील हा किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने मध्यम समजला जातो.

कल्याण, कर्जत व पनवेल या विभागात हा किल्ला आहे. ताहुलीला किल्ला किंवा गड म्हणणे तसे अयोग्यच. हा त्याच्या तीन सुळक्यांमुळे प्रसिद्ध आहे. उंच बेलाग कडे, जाण्याच्या अवघड वाटा यामुळे ताहुली वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि कदाचित यामुळेच दुर्लक्षितही आहे.

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे : ताहुलीच्या पठारावर संत गाडगेबाबा महाराजांचा मठ आहे. या वाटेत आणखी दोन आश्रम लागतात. पठाराच्या सर्वात वरच्या भागाला ‘दादीमा ताहुली’ म्हणतात. येथे ५ पीर आहेत. समोरच एक छोटेसे घर देखील आहे. याच वाटेने थोडे पुढे गेल्यावर दोन तासात आपण ताहुलीच्या सुळक्यापाशी पोहोचतो. एका सुळक्याचे नाव ‘दाऊद’ तर दुसऱ्याचे नाव ‘बामण’ आहे.

गडावर जाण्याच्या वाटा : ताहुलीवर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत.

१. अंबरनाथ वरून जाते. अंबरनाथवरून बाहेर पडून बदलापुरचा रस्ता ओलांडावा. थोड्याच वेळात काकुली नावाचा तलाव लागतो. या काकुली तलावापासून थोड्याच अंतरावा एक डोंगराची सोंड वर ताहुलीच्या तीन सुळक्यांपाशी पोहोचते. या वाटेने ताहुली पठार गाठण्यास ४ तास लागतात.

२. कुशीवली वरून कल्याण मलंगगड रोडवर कुशीवली गावाच्या स्टॉपवर उतरणे. गावाच्या बाहेरूनच थेट बैलगाडी जाईल एवढी मोठी वाट ताहुलीला गेली आहे. ही वाट दोन डोंगराच्या बेचक्यातून वर चढते. कुशीवली गावापासून वर पठारावर जाण्यास अडीच तास लागतात.

गडावर राहण्याची सोय नाही. येथे जेवणाची सोय नाही, आपणच सोय करावी लागते. पाण्याची सोय नाही. जाण्यासाठी अडीच तास कुशीवली मार्गे व चार तास काकुली लेक मार्गे लागतात.

#ताहुली #किल्ला #TahuliKilla #TahuliFort

तुंग किल्ला

तुंग किल्ला Tung Fort – ३००० फूट उंचीचा हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे.
पुणे जिल्ह्यातील लोणावळा डोंगररांगेतील हा किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने सोपा समजला जातो.

किल्ल्याची नावावरून आपल्या सर्वांना असेच वाटेल की, किल्ला चढायला खरोखरच कठीण आहे मात्र किल्ला चढण्यास फारच सोपा आहे. पवन मावळ प्रांतातीळ तुंग किला हा एक घाटरक्षक दुर्ग म्हणून ओळखला जातो. पूर्वी बोरघाटामार्गे चालणाऱ्या वाहतुकीवर नजर ठेवण्यासाठी या किल्ल्याचा उपयोग होत असे. या किल्ल्यावरून लोहगड, विसापूर, पवन मावळ हा सर्व परिसर नजरेत येतो.

इतिहास : या किल्ल्याला तशी वैभवशाली इतिहासाची परंपरा लाभलेली नाही. मात्र १६५७ मध्ये मावळ प्रांतातील इतर किल्ल्यांसमवेत हा किल्ला देखील स्वराज्यात सामील झाला. सन १६६० मध्ये या भागाच्य सुरक्षिततेसाठी नेताजी पालकर यांची नियुक्ती झाली. जयसिंगाने आणि दिलेरखानाने आपल्या स्वारीच्या वेळी ६ मे १६६५ रोजी तुंग आणि तिकोना या भागातील अनेक गावे जाळली. पण,हे किल्ले मात्र जिंकू शकले नाही. १२ जून १६६५ पुरंदर तहानुसार १८ जूनला कुबादखानाने हलालखान व इतर सरदारांसोबत ह्या परिसराचा ताबा घेतला.

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे : गडमाथा फारच आटोपता असल्यामुळे एक तासात सर्व गड पाहून होतो. तुंगवाडीतून गडावर जाणारी वाट मारुतीच्या मंदिरा जवळून जाते. या मंदिरात ५ ते ६ जणांची राहण्याची सोय होते. या मंदिरापासून थोड्याच अंतरावर गडावर जाण्यासाठी पायऱ्या लागतात. पायऱ्यांच्या वाटेत अंतरावर हनुमान मंदिर लागते. पुढे गोमुखी रचनेचा दरवाजा आहे. येथून आतं शिरल्यावर आपण गड माथ्यावर पोहोचतो. उजवीकडे गणेशाचे मंदिर आहे. मंदिराच्या मागील बाजूस पाण्याचा खंदक आढळतो. येथूनच बालेकिल्ल्यावर जाणारी वाट आहे. बालेकिल्ल्यावर तुंगीदेवीचे मंदिर आहे. मंदिरा समोरच जमिनीत खोदलेली गुहा आहे. यात पावसाळ्या शिवाय इतर ऋतुत २ ते ३ जणांची राहण्याची सोय होऊ शकते. अशा प्रकार एक दिवसात किल्ला पाहून लोणावळ्याला परतता येते.

गडावर जाण्याच्या वाटा : या गडावर जाणाऱ्या सर्व वाटा पायथ्याच्या तुंगवाडीतूनच जातात. या वाडीतून गडावर जाण्यास साधारणतः ४५ मिनिटे लागतात. गडमाथा तसा लहान असल्यामुळे एक तासात सर्व गड पाहून होतो.

घुसलखांब फाट्यामार्गे : गडावर जाण्यासाठी लोणावळा स्टेशनवर पोहचावे. येथून भांबूर्डे अथवा आंबवणे कडे जाणारी एस.टी पकडून २६ कि.मी. अंतरावरील घुसलखांब फाट्यापाशी उतरावे. या फाट्यापासून दीड तासांची पायपीट केल्यावर आपण ८ कि.मी. अंतरवरील तुंगवाडीत पोहोचतो.येथून गडावर पोहचण्यास ४५ मिनिटे लागतात.

ब्राम्हणोली-केवरे : अनेकजण तिकोना ते तुंग असा ट्रेक देखील करतात. यासाठी तिकोना किल्ला पाहून तिकोनापेठेत उतरावे आणि काळे कॉलनीचा रस्ता धरावा. वाटेतच ब्राम्हणोली गावं लागते. यागावातून लॉंच पकडून पवनेच्या जलाशयात जलविहाराची मौज लुटत पलीकडाच्या तीरावरील केवरे या गावी यावे. केवरे गावापासून २० मिनिटातच आपण तुंगवाडीत पोहोचतो.

तुंगवाडीच्या फाट्या मार्गे : जर लॉंच ची सोय उपलब्ध नसेल तर तिकोनापेठेतून दुपारी ११.०० वाजताची एस.टी. महामंडाळाची कामशेत-मोरवे गाडी पकडून मोरवे गावाच्या अलीकडच्या तुंगवाडीत फाट्यावर उतरावे. येथून पाऊण तासांची पायपीट केल्यावर आपण तुंगवाडीत पोहचतो.

तुंगवाडीतील मारुतीच्या मंदिरात ६ ते ७ जणांची राहण्याची सोय होते. तुंगवाडीत भैरोबाचे देखील मंदिर आहे यात २० जणांना राहता येते. जेवणाची सोय आपण स्वतः करावी. मंदिरा जवळच गावात पाणी उपलब्ध आहे. गडावर जाण्यासाठी पायथ्यापासून ४५ मिनिटे लागतात.

#तुंग #किल्ला #TungKilla #TUngFort

रोहीडा किल्ला

रोहीडा किल्ला Rohida Fort – ३३६० मी. उंचीचा हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे.
सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर डोंगररांगेतील हा किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने मध्यम समजला जातो.

सह्याद्रीच्या डोंगररांगेत भोर ते महाबळेश्वर असा एक सुरेख डोंगरमार्ग आहे. या डोंगररांगेत ३ ते ४ किल्ले आहेत. यापैकी एक रोहीड खोऱ्यात वसलेला किल्ला म्हणजेच ‘किल्ले रोहीड खोरे हे नीरा नदीच्या खोऱ्यात काही भागात वसलेले आहे. या खोऱ्यात ४२ गावे होती. त्यापैकी ४१ गावे सध्याच्या पुणे जिल्ह्याच्या भोर तालुक्यात मोडतात. रोहीड किल्ला हे रोहीडा खोऱ्याचे प्रमुख ठिकाण होते. पुणे सातारा जिल्ह्यातील सहकारी साखर कारखाने, सहकारी दुधयोजना यामुळे येथील परिसरातील बहुतेक सर्व गावापर्यंत बस, वीज आदी सुविधा पोहचल्या आहेत. त्यामुळे येथील जीवन सुखी झालेले आहे. रोहीडा किल्ला भोरच्या दक्षिणेस सुमारे ६ मैलांवर आहे. रोहीडा किल्ल्याला विचित्रगड किंवा बिनीचा किल्ला असे देखील संबोधले जाते.

इतिहास : या किल्ल्याची निर्मिती ही यादवकालीन आहे. या किल्ल्यावरील तीसऱ्या दरवाजावर असणाऱ्या शिलालेखावरून मुहम्मद आदिलशहाने ह्या गडाची दुरुस्ती केली असे अनुमान निघते. या शिलालेखावरून मे १६५६ नंतर हा किल्ला शिवाजी महाराजांनी बांदल देशमुखांकडून घेतला असे समजते. किल्ला घेण्यासाठी राजांना बांदल देशमुखांशी हातघाईची लढाई करावी लागली. यात कृष्णाजी बांदल मारला गेला. बाजीप्रभू देशपांडे बांदलाचे मुख्य कारभारी होते. लढाईतर बाजीप्रभू देशपांडे व इतर सहकाऱ्यांना स्वराज्यात सामील करून घेतले गेले. इ.स. १६६६ च्या पुरंदरच्या तहानुसार हा किल्ला मोघलांच्या स्वाधीन केला गेला. २४ जून१६७० रोजी शिवरायांनी किल्ला परत घेतला. कान्होजी यांच्याकडे भोरची पूर्ण तर रोहीडा किल्ल्याची निम्मी देशमुखी व जमिनीचे काही तुकडे इनाम होते. रोहीड्याचे गडकरी त्यांचेकडून ३० होन घेत होते. शिवाजी महाराजांच्या अधिकाऱ्यांनी शिवाजी महाराजांकडे विचारणा केली की ३० च होन का, शिवाजी महाराजांनी निर्णय दिला की, जेथे आपले चाकर असल्यामुळे पूर्वापार चालत आलेले द्रव्यच घ्यावे. पुढे किल्ला मोघलांनी जिंकला, मात्र भोरच्या पंत सचिवांनी औरंगजेबाशी झुंजून किल्ला स्वराज्यात पुन्हा दाखल केला. संस्थाने विलीन होईपर्यंत राजगड, तोरणा, तुंग आणि तिकोना किल्ल्याप्रमाणे हाही किल्ला भोरकरांकडे होता.

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे : पहिल्या दरवाज्याच्या चौकटीवर गणेशपट्टी आणि वर मिहराब आहे. पुढे १५ ते २० पायऱ्या पार केल्यावर दुसरा दरवाजा लागतो. येथून आत गेल्यावर समोरच पाण्याचे भुयारी टाके आहे. याचे पाणी बाराही महिने पुरते. येथून ५-७ पायऱ्या चढून गेल्यावर तिसरा दरवाजा लागतो. हा दरवाजा अतिशय भक्कम आहे. यावर बऱ्याच प्रमाणात कोरीव काम आढळते. दोनही बाजूंस हत्तीचे शिर कोरण्यात आले आहे. तसेच डाव्या बाजूला मराठी उजव्या बाजूला फारसी शिलालेख आहे. आजुबाजूच्या तटबंदीची पडझड झाली आहे. ह्या सर्व दरवाजांची रचना एकमेकांना काटकोनात आहे. येथून आत शिरल्यावर समोरच २ वास्तू दिसतात. एक गडावरील सदर असावी तर दुसरे किल्लेदाराचे घर असावे. डाव्या बाजूला थोडे अंतर चालून गेल्यावर रोहिडमल्ल उर्फ भैराबाचे मंदिर लागते. मंदिरासमोर लहानसे टाके, दीपमाळ व चौकोनी थडगी आहेत. देवळात गणपती, भैरव व भैरवी यांच्या मूर्ती आहेत. रोहीड्याचा घेर तसा लहानच आहे. किल्ल्याच्या आग्नेयस शिरवले बुरूज, पश्चिमेस पाटणे बुरूज व दामगुडे बुरूज, उत्तरेस वाघजाईचा बुरूज व पूर्वेस फत्ते बुरूज व सदरेचा बुरूज असे एकूण ६ बुरूज आहेत. गडाची तटबंदी व बुरुजांचे बांधकाम अजूनही मजबूत आहेत. गडाच्या उत्तरेकडील भागात टाक्यांची सलग रांग आहे. येथेच एक भूमिगत पाण्याचे टाके आहे. तेथेच मानवी मूर्ती व शिवपिंडी आहे. संपूर्ण गड फिरण्यास दीड तास पुरतो.

गडावर जाण्याच्या वाटा :

बाजारवाडी मार्गे : दक्षिणेस ८-१० किमी अंतरावर बाजारवाडी नावाचे गाव आहे. बाजारवाडीपर्यंत जाण्यासाठी एसटी सेवा उपलब्ध आहे. बाजारवाडीपासून वळलेली वाट गडाच्या पहिल्या दरवाजापाशी घेऊन जाते. वाट अत्यंत सोपी असून दरवाजापर्यंत पोहचण्यास एक तास लागतो. अंबवडे मार्गे भोर ते अंबवडे अशी एसटी सेवा उपलब्ध आहे. पुणे-भोर-पानवळ-अंबवडे अशी बससेवा देखील उपलब्ध आहे. या गाडीने अंबवडे गावी उतरून गावाच्या पूर्वेकडील दांडावरून गड चढण्यास सुरुवात करावी. ही वाट लांबची आणि निसरडी आहे. या वाटेने गड गाठण्यास सुमारे अडीच तास पुरतात. शक्यतो गडावर जाताना बाजारवाडी मार्गे जावे आणि उतरताना नाझरे किंवा अंबवडे मार्गे उतरावे. म्हणजे रायरेश्वराकडे जाण्यास सोपे जाते.

रोहीडा ते रायरेश्वर वाटा : १. भोर -कारी बसने कारी गावात उतरावे. तिथून लोहदरा मार्गे २ तासांत रायरेश्वर पठाराकडे पोहचतो व पठारावरील वस्ती पर्यंत जाण्यास दीड तास लागतो. २. वडतुंबी मार्गे – दुपारची (२.४५) भोर-टिटेघर गाडी आंबवण्यास येते. तिने वडातुंबी फाट्यावर उतरावे. तिथून १५ मिनिटांत वडातुंबी गाव गाठणे. येथून साधारणतः २ तासात गणेशदरा मार्गे रायरेश्वर पठारावर पोहचता येते. ३. भोर- कोर्लेगाडीने कोर्लेगावात उतरावे. रात्री उशीर झाल्यास गावात मुक्काम करून पहाटे गायदरा मार्गाने ३ तासात रायरेश्वर पठारावरील देवळात जाता येते. ४. भोर-दाबेकेघर बसने दाबेकेघरला उतरायचं व तिथून धानवली पर्यंत चालत जायंच. पुढे वाघदरामार्गे ३ तासात रायरेश्वर गाठायचं.

रोहीडमल्लच्या मंदिरात ५ ते ७ जणांची रहाण्याची सोय होते. पावसाळ्यात मात्र मंदिरात रहाता येत नाही. जेवणाची सोय आपण स्वतःच करावी. गडावर पिण्याचे पाणी बारमाही उपलब्ध आहे. गडावर जाण्यासाठी बाजारवाडी मार्गे – १ तास लागतो.

वासोटा किल्ला

वासोटा किल्ला Vasota Fort ४२६७ फूट उंचीचा हा किल्ला वनदुर्ग प्रकारातील आहे.
सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर कोयना डोंगररांगेतील हा किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने मध्यम समजला जातो.

काळ्या मातीच्या या महाराष्ट्रातील, कोयना नदीच्या खोऱ्यात, रानात वसलेला दुर्ग म्हणजे ‘किल्ले वासोटा’ ज्ञानेश्वरीत वासोट्याचा अर्थ ‘आश्रयस्थान’ असा दिला आहे. वासोट्यालाच ‘व्याघ्रगड’ असेही दुसरे नाव आहे. कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्राच्या दुर्गमतेमुळेच हा भाग वन्यजीवनाने समृद्ध बनला आहे.

इतिहास : वासोटा किल्ला प्राचीनत्वाचा शोध घेता आपल्याला वरिष्ठ ऋषींच्या काळापर्यंत मागे जावे लागेल असे मानले जाते की, वरिष्ठ ऋषींचा कोणी एक शिष्य, अगस्ती ऋषी यांनी विंध्य पर्वत ओलांडून दक्षिणेकडचा मार्ग शोधला. सह्याद्रीच्या कोयना काठच्या त्या शिखरावर राहण्यास आला व त्याने आपल्या निवासी डोंगराला आपल्या गुरूंचे नाव दिले. कालांतराने या देशीच्या क्षत्रियांनीत्या डोंगराला तटाबुरूजाचे साज चढवून लष्करी ठाणे केले. त्या डोंगराचे परंपरागत ‘वरिष्ठ’ हे नाव अपभ्रंश होऊन ‘वासोटा ’ झाले. प्रत्यक्ष उल्लेखित नसला तरीही, हा किल्ला शिलाहारकालीन असावा. शिलाहारांच्या किल्ल्यांच्या नामावलीत ‘वंसतगड’ या नावाने उल्लेखिलेला किल्ला हा वासोटा असावा. मराठी साम्राज्याच्या छोट्या बखरीवरून शिवरायांनी जावळी विजयानंतर वासोटा घेतला असे सांगितले जाते. पण ते खरे नाही. जावळी घेताना, जावळीतील तसेच कोकणातील इतर किल्ले शिवरायांनी घेतले पण वासोटा दूर सल्याने किल्लेदाराच्या हाती राहीला. अफझल वधानंतर काढलेल्या मोहिमेतही वासोटा वासोटा किल्ला येत नव्हता. पुढे शिवराय पन्हाळगडवर अडकलेले असताना, आपल्या मुखत्यारीत मावळातील पायदळ पाठवून त्यांनी वासोटा किल्ला दि. ६ जून १६६० रोजी घेतला. सन १६६१ मध्ये पकडलेल्या इंग्रज कैद्यांपैकी फॅरन व सॅम्युअल यांना वासोट्यावर कैदेत ठेवण्यात आले होते. पुढे १६७९ मध्ये वासोटा किल्ल्यावर २६,००० रुपये सापडले. पुढच्या काळात १७०६ मध्ये पंतप्रतिनिधींच्या उपपत्नी ताली तेलिणीने हा किल्ला आपल्या हातात घेतला. पुढीलवर्षी पेशव्यांचे सेनापती बापू गोखले यांनी ताई तेलिणी बरोबर लढाई केली. ताई तेलिणीने आठ-दहा महिने प्रखर झुंज देऊन किल्ला लढवला. १७३० मध्ये वासोटा किल्ला बापू गोखल्यांच्या हाती पडला.

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे : वासोटा किल्ल्यावर जाण्यासाठी दोन दरवाजे लागतात. यातील पहिला दरवाजा ढासळलेल्या अवस्थेत आहे. दरवाजाने गडावर प्रवेश करता येतो . समोरच मारुतीचं बिन छपराचं मंदिर आहे. मंदिरापासून प्रमुख तीन वाटा जातात. सरळ जाणाई वाटा किल्ल्यावरील भग्नावशेषांकडे घेऊन जाते. उजव्या बाजूस जाणारी वाट ‘काळकाईच्या ठाण्याकडे’ जाते. वाटेतच महादेवाचे सुंदर मंदिर लागते. मंदिरात दोन ते तीन जणांची राहण्याची सोय होऊ शकते. येथून पुढे जाणारी वाट माचीवर घेऊन जाते. या माचील पाहून लोहगडच्या विंचूकाठ्याची आठवण येते. याच माचीलाच काळकाईचे ठाणे म्हणतात. या माचीवरून दिसणारा आजुबाजूचा घनदाट झाडांनी व्यापलेला प्रदेश, चकदेव, रसाळ, सुमार, महिपतगड, कोयनेचा जलाशय हा संपूर्ण देखावा मोठा रमणीय आहे. मारुतीच्या देवळाच्या डावीकडे जाणारी वाट आपल्याला जोड टाक्यांपाशी घेऊन जाते. या टाक्यातील पाणी पिण्यासाठी योग्य आहे. पुढे ही वाटा जंगलात शिरते आणि बाबुकड्यापाशी येऊन पोहोचते. या कड्याचा आकार इंग्रजी ‘ण’ अक्षरा सारखा आहे. याला पाहून हरिश्चंद्रगडाच्या कोकणकड्याची आठवण येते. समोरच उभा असणारा आणि आपले लक्ष वेधून घेणारा उंच डोंगर म्हणजेच ‘जुना वासोटा’ होय.जुना वासोटा नव्या वासोट्याच्या बाबुकड्यावर उभे राहिल्यावर समोरच उभा असणारा डोंगर म्हणजे जुना वासोटा. आता या गडावर जाणारी वाटा अस्तित्वात नाही. तसेच पाण्याचीही तुटवडा आहे. घनदाट झाडे व वन्यश्वापदेही असल्याने सहसा येथे कोणी जात नाही.

गडावर जाण्याच्या वाटा :वासोटा किल्ल्यावर जाण्यासाठी दोन प्रमुख मार्ग आहेत. एक नागेश्वरमार्गे आणि दुसरा थेट वासोट्याकडे.

सातारामार्गे वासोटा :

१) कुसापूर मार्गे : साताऱ्याहून बामणोली या गावी यावे. सकाली ९ वाजता साताऱ्याहून बसची सोय आहे. येथून कुसापूरला कोयना धरणाचा जलाशय लॉंचने पार करून जाता येते. कुसापूरहून दाट जंगलात दोन वाटा जातात. उजवीकडे जाणारी वाट आठ मैलांवरील नागेश्वराकडे नेते तर डावीकडे जाणारी वाट वासोट्यावर घेऊन जाते.

२) खिरकंडी मार्गे : साताऱ्याहून बसने ‘वाघाली देवाची’ या गावी यावे, येथून लॉंचच्या सहाय्याने जलाशय पार करून खिरकंडी या गावी यावे. येथून धनगर वाडी पासून जाणारी वाट ‘मेट इंदवली’ या गावात घेऊन जाते. साताऱ्यापासून इथवरचा प्रवास आठ-नऊ तासांचा आहे. येथून पुढे पाच-सहा तासात वासोट्यावर जाता येते.

३) महाबळेश्वर मार्गे : महाबळेश्वरहून ‘तापोळे’ गावी येऊन लॉंचने कुसापूर गाठता येते, आणि तेथून वासोटा गाठावे. चिपळूणहून वासोटा १. चिपळूणहून स. ८.३० वाजताच्या बसने ‘चोरवणे’ या गावी यावे. येथून ५ ते ६ तासात वसोट्याला पोहोचता येते. य मार्गात वाटेत कुठेच पाणी नसल्यामुळे आपल्याकडे पाण्याचा भरपूर साठा घेऊन जावे. या वाटेने वर गेल्यावर एक पठार लागते. पठारावरून डावीकडे जाणारी वाट नागेश्वर कडे तर उजवीकडची वाट वासोट्याला जाते. येथे नागेश्वराकडे जाणाऱ्या वाटेने थोडे पुढे गेल्यावर खाली एक वाट जंगलात विहिरीकडे जाते. येथून वासोट्याचे अंतर दोन तासात कापता येते. २. चिपळूणहून ‘तिवरे’ या आवी यावे. येथून रेडे घाटाने वासोट्याला जाता येते.

नागेश्वर मार्गे वासोटा : नागेश्वराला भेट दिल्याशिवाय वासोट्याची भेट पूर्ण होऊच शकत नाही. वासोट्यावर जाताना समोरच एक सुळका आपले लक्ष वेधून घेतो. त्यालाच नागेश्वर म्हणता. या सुळक्याच्या पोटात एक गुहा आसून, तेथे महादेवाचे मंदिर आहे. हजारो, नागरिक दर शिवरात्रीला या पवित्र स्थानी दर्शनास येतात. गुहेच्या छतावरून बाराही महिने पाण्याच्या थेंबांचा अभिषेक शिवलिंगावर होत असतो. बहुतेक ट्रेकर्स प्रथम नागेश्वराचे दर्शन घेऊन मग वासोट्याला जातात. त्यासाठी फक्त लांबचा पल्ला चालण्याची तयारी असावी लागते.

पूर्वी उल्लेखिलेल्या नव्या वासोट्यावरील महादेवाच्या मंदिरात २ ते ३ जणांची राहण्याची सोय होते. नव्या वासोट्यावर जोड टाक्यांच्या शेजारील पठारावरही राहता येते. नागेश्वराची गुहा ही राहण्यासाठी उत्तम जागा आहे. येथे २० ते २५ जन आरामात राहू शकतात. जेवणाची सोय आपण स्वतःच करावी. नागेश्वराच्या गुहेकडे जातांना, पायऱ्यांच्या उजवीकडून जंगलात जाणाई वाट पाण्याच्या विहीरीपाशी घेऊन जाते जाते. नव्या वासोट्यावरही मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध आहे. उन्हाळ्यातही या विहिरीला पाणी असते. गडावर जाण्यासाठी कुसापूर मार्गे ४ तास व चोरवणे मार्गे ७ तास लागतात.

सूचना : वासोट्याला पावसाळ्यात जाताना जळवांचा मोठ्या प्रमाणावर त्रास होतो. तेव्हा आवश्यक ती काळजी घ्यावी. चिपळूणहून चोरवणे मार्गेवासोट्याला जाताना वाटेत पाण्याची कुठेही सोय नाही. तेव्हा पाण्याचा पुरेसा साठा जवळ बाळगणे आवश्यक आहे.

तोरणा किल्ला

तोरणा किल्ला Torana Fort – १४०० मीटर उंचीचा हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे.
पुणे जिल्ह्यातील पुणे डोंगररांगेतील हा किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने मध्यम समजला जातो.

शिवाजी महाराजांनी सुरुवातीच्या काळात जे काही किल्ले घेतले त्यापैकी एक किल्ला तोरणा. गडावर तोरण जातीची पुष्कळ झाडी असल्यामुळे गडाचे नाव पडले तोरणा. महाराजांनी गडाची पहाणी करतांना याच्या प्रचंड विस्तारामुळे याचे ‘प्रचंडगड’ असे नाव ठेवले.पुणे जिल्ह्याच्या वेल्हा तालुक्यातून गेलेल्या सह्याद्रीच्या रागेंतून दोन पदर निघून पूर्वेला पसरत गेलेले आहेत. यापैकी पहिल्या पदरावर तोरणा व राजगड वसलेले आहेत तर दुसऱ्या पदराला भुलेश्वर रांग म्हणतात. पुण्याच्या नैऋत्येस असलेल्या पर्वतराजीमध्ये उत्तर अक्षांश व पूर्व रेखांशावर हा किल्ला आहे. याच्या दक्षिणेला वेळवंडी नदी व उत्तरेला कानद नदीचे खोरे आहे. गडाच्या पश्चिमेला कानद खिंड, पूर्वेला बामण व खरीव खिंडी आहेत.

इतिहास : हा किल्ला कधी आणि कोणी बांधला याचा पुरावा आज उपलब्ध नाही. येथील लेण्यांच्या आणि मंदिरांच्या अवशेषांवरुन हा शैवपंथाचा आश्रम असावा. इ.स. १४७० ते १४८६ च्या दरम्यान बहमनी राजवटीसाठी मालिक अहमद याने हा किल्ला जिंकला. पुढे हा किल्ला निजामशाहीत गेला. नंतर तो महाराजांनी घेतला व याचे नाव प्रचंडगड ठेवले. गडावर काही इमारती बांधल्या. राजांनी आग्ऱ्याहून आल्यावर अनेक गडांचा जीर्णोद्धार केला. त्यात ५ हजार होन इतका खर्च त्यांनी तोरण्यावर केला. संभाजी महाराजांचा वध झाल्यावर हा किल्ला मोगलांकडे गेला. शंकराजी नारायण सचिवांनी तो परत मराठ्यांच्या ताब्यात आणला. पुढे इ.स. १७०४ मध्ये औरंगजेबाने याला वेढा घातला व लढाई करून आपल्या ताब्यात आणला व याचे नाव फुतुउल्गैब म्हणजे दैवी विजय ठेवले. पण परत चार वर्षांनी सरनोबत नागोजी कोकाटे यांनी गडावर लोक चढवून गड पुन्हा मराठ्यांच्या ताब्यात आणला व यानंतर तोरणा कायम स्वराज्यातच राहिला. पुरंदरच्या तहात जे किल्ले मोगलांना दिले त्यामध्ये तोरणा महारजांकडेच राहिला. विशेष म्हणजे औरंगजेब बादशहाने लढाई करून जिंकलेला असा हा मराठ्यांचा एकमेव किल्ला होय.

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे :

गडावर जाण्याच्या वाटा :

गडावरील मेंगाई देवीच्या मंदिरात १० ते १५ जणांची राहण्याची सोय होते. जेवणाची सोय आपण स्वतःच करावी. मेंगाई देवीच्या मंदिराच्या समोरच बारामही पाण्याचे टाके आहे. गडावर जाण्यासाठी अडीच तास वेल्हेमार्गे, ६ तास राजगड-तोरणा मार्गे लागतात.

सूचना : गडावर जाणारी वाट :- कठीण – राजगड -तोरणा मार्गे

सुमारगड किल्ला

सुमारगड किल्ला Sumargad Fort – २००० फूट उंचीचा हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे.
महाबळेश्वर जिल्ह्यातील महाबळेश्वर कोयना डोंगररांगेतील हा किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने कठीण समजला जातो.

सुमारगड हा नावाप्रमाणेच सुमार आहे. ‘उगवतीच्या कड्यावर एका झाडाला धरून वर येंगाव लागत. असा गोनीदांनी या किल्ल्याच्या बद्दलच्या वर्णनात म्हटलेले आहे. रसाळगड आणि महिपतगड यांच्या बरोबर मध्ये हा किल्ला येतो. आजुबाजूला असणारे जंगल आणि किल्ल्यावर जाण्यासाठी असणारी अवघड वाट यामुळे किल्ला फारच दुर्लक्षित झालेला आहे.

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे : किल्ल्यावर पोहचल्यावर समोरच पाण्याची दोन टाकी आहेत. टाक्यांच्या पोटातच एक गुहा आहे. यात शिवाची पिंड आणि देवीची मूर्ती आहे. पाण्याच्या टाक्यांच्या उजव्या अंगास थोडे वर गेल्यावर एकखांबी पाण्याचे टाके लागते. एक वाट समोरच्या टेकाडावर जाते तर एक टेकाडाला वळसा घालून पुन्हा टाक्यांपाशी येते. समोरच्या टेकडीला वळसा मारताना एका ठिकाणी दगडमातीने बुजलेली गुहा दिसते. या गुहेत दोन खोल्या आहेत. मात्र यात बऱ्याच मोठ्या प्रमाणावर माती जमा झालेली आहे. गडमाथा फारच लहान असल्यामुळे गडफेरीस अर्धा तास पुरतो.

गडावर जाण्याचा वाटा : सुमारगडावर जाण्यासाठी एकच वाट आहे. ही वाट एका खिंडीतून वर जाते. या दोन्ही वाटा एक खिंडीतच येऊन मिळतात. महिपत गडावरून वाडीबेलदार या गावात न उतरता उलट्या दिशेने खाली उतरावे. वाटेत धनगराची दोन तीन घर लागतात. येथून थोडे खाली उतरल्यावर एक ओढा लागतो तो पार करून समोरचा डोंगर चढावा. पुढे अर्ध्या तासातच आपण एका खिंडीपाशी पोहचतो. खिंडीतून डावीकडे वर चढणारी वाट थेट सुमारगडावर घेऊन जाते. या वाटेने पुढे गेल्यावर थोड्याच वेळात आपण एका कड्यापाशी पोहचतो. कड्याला लागूनच वाट पुढे जाते पुढची वाट अवघड आहे. जवळ रोप असल्यास फारच उत्तम, खिंडीपासून किल्ल्यावर जाण्यास पाऊण तास पुरतो. रसाळगडावरून सुमारगडाकडे यायचे झाल्यास वाटेत एक राया धनगराचा झाप लागतो. मात्र रसाळगड ते सुमारगड हे अंतर साडेचार तासाचे आहे.

गडावर राहण्याची सोय नाही. जेवणाची सोय नाही. पाण्याची सोय बारामही उपलब्ध आहे. गडावर जाण्यासाठी महिपतगडामार्गे अडीच तास लागतात.