Tuesday, 26 February 2019

तुंग किल्ला

तुंग किल्ला Tung Fort – ३००० फूट उंचीचा हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे.
पुणे जिल्ह्यातील लोणावळा डोंगररांगेतील हा किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने सोपा समजला जातो.

किल्ल्याची नावावरून आपल्या सर्वांना असेच वाटेल की, किल्ला चढायला खरोखरच कठीण आहे मात्र किल्ला चढण्यास फारच सोपा आहे. पवन मावळ प्रांतातीळ तुंग किला हा एक घाटरक्षक दुर्ग म्हणून ओळखला जातो. पूर्वी बोरघाटामार्गे चालणाऱ्या वाहतुकीवर नजर ठेवण्यासाठी या किल्ल्याचा उपयोग होत असे. या किल्ल्यावरून लोहगड, विसापूर, पवन मावळ हा सर्व परिसर नजरेत येतो.

इतिहास : या किल्ल्याला तशी वैभवशाली इतिहासाची परंपरा लाभलेली नाही. मात्र १६५७ मध्ये मावळ प्रांतातील इतर किल्ल्यांसमवेत हा किल्ला देखील स्वराज्यात सामील झाला. सन १६६० मध्ये या भागाच्य सुरक्षिततेसाठी नेताजी पालकर यांची नियुक्ती झाली. जयसिंगाने आणि दिलेरखानाने आपल्या स्वारीच्या वेळी ६ मे १६६५ रोजी तुंग आणि तिकोना या भागातील अनेक गावे जाळली. पण,हे किल्ले मात्र जिंकू शकले नाही. १२ जून १६६५ पुरंदर तहानुसार १८ जूनला कुबादखानाने हलालखान व इतर सरदारांसोबत ह्या परिसराचा ताबा घेतला.

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे : गडमाथा फारच आटोपता असल्यामुळे एक तासात सर्व गड पाहून होतो. तुंगवाडीतून गडावर जाणारी वाट मारुतीच्या मंदिरा जवळून जाते. या मंदिरात ५ ते ६ जणांची राहण्याची सोय होते. या मंदिरापासून थोड्याच अंतरावर गडावर जाण्यासाठी पायऱ्या लागतात. पायऱ्यांच्या वाटेत अंतरावर हनुमान मंदिर लागते. पुढे गोमुखी रचनेचा दरवाजा आहे. येथून आतं शिरल्यावर आपण गड माथ्यावर पोहोचतो. उजवीकडे गणेशाचे मंदिर आहे. मंदिराच्या मागील बाजूस पाण्याचा खंदक आढळतो. येथूनच बालेकिल्ल्यावर जाणारी वाट आहे. बालेकिल्ल्यावर तुंगीदेवीचे मंदिर आहे. मंदिरा समोरच जमिनीत खोदलेली गुहा आहे. यात पावसाळ्या शिवाय इतर ऋतुत २ ते ३ जणांची राहण्याची सोय होऊ शकते. अशा प्रकार एक दिवसात किल्ला पाहून लोणावळ्याला परतता येते.

गडावर जाण्याच्या वाटा : या गडावर जाणाऱ्या सर्व वाटा पायथ्याच्या तुंगवाडीतूनच जातात. या वाडीतून गडावर जाण्यास साधारणतः ४५ मिनिटे लागतात. गडमाथा तसा लहान असल्यामुळे एक तासात सर्व गड पाहून होतो.

घुसलखांब फाट्यामार्गे : गडावर जाण्यासाठी लोणावळा स्टेशनवर पोहचावे. येथून भांबूर्डे अथवा आंबवणे कडे जाणारी एस.टी पकडून २६ कि.मी. अंतरावरील घुसलखांब फाट्यापाशी उतरावे. या फाट्यापासून दीड तासांची पायपीट केल्यावर आपण ८ कि.मी. अंतरवरील तुंगवाडीत पोहोचतो.येथून गडावर पोहचण्यास ४५ मिनिटे लागतात.

ब्राम्हणोली-केवरे : अनेकजण तिकोना ते तुंग असा ट्रेक देखील करतात. यासाठी तिकोना किल्ला पाहून तिकोनापेठेत उतरावे आणि काळे कॉलनीचा रस्ता धरावा. वाटेतच ब्राम्हणोली गावं लागते. यागावातून लॉंच पकडून पवनेच्या जलाशयात जलविहाराची मौज लुटत पलीकडाच्या तीरावरील केवरे या गावी यावे. केवरे गावापासून २० मिनिटातच आपण तुंगवाडीत पोहोचतो.

तुंगवाडीच्या फाट्या मार्गे : जर लॉंच ची सोय उपलब्ध नसेल तर तिकोनापेठेतून दुपारी ११.०० वाजताची एस.टी. महामंडाळाची कामशेत-मोरवे गाडी पकडून मोरवे गावाच्या अलीकडच्या तुंगवाडीत फाट्यावर उतरावे. येथून पाऊण तासांची पायपीट केल्यावर आपण तुंगवाडीत पोहचतो.

तुंगवाडीतील मारुतीच्या मंदिरात ६ ते ७ जणांची राहण्याची सोय होते. तुंगवाडीत भैरोबाचे देखील मंदिर आहे यात २० जणांना राहता येते. जेवणाची सोय आपण स्वतः करावी. मंदिरा जवळच गावात पाणी उपलब्ध आहे. गडावर जाण्यासाठी पायथ्यापासून ४५ मिनिटे लागतात.

#तुंग #किल्ला #TungKilla #TUngFort

रोहीडा किल्ला

रोहीडा किल्ला Rohida Fort – ३३६० मी. उंचीचा हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे.
सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर डोंगररांगेतील हा किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने मध्यम समजला जातो.

सह्याद्रीच्या डोंगररांगेत भोर ते महाबळेश्वर असा एक सुरेख डोंगरमार्ग आहे. या डोंगररांगेत ३ ते ४ किल्ले आहेत. यापैकी एक रोहीड खोऱ्यात वसलेला किल्ला म्हणजेच ‘किल्ले रोहीड खोरे हे नीरा नदीच्या खोऱ्यात काही भागात वसलेले आहे. या खोऱ्यात ४२ गावे होती. त्यापैकी ४१ गावे सध्याच्या पुणे जिल्ह्याच्या भोर तालुक्यात मोडतात. रोहीड किल्ला हे रोहीडा खोऱ्याचे प्रमुख ठिकाण होते. पुणे सातारा जिल्ह्यातील सहकारी साखर कारखाने, सहकारी दुधयोजना यामुळे येथील परिसरातील बहुतेक सर्व गावापर्यंत बस, वीज आदी सुविधा पोहचल्या आहेत. त्यामुळे येथील जीवन सुखी झालेले आहे. रोहीडा किल्ला भोरच्या दक्षिणेस सुमारे ६ मैलांवर आहे. रोहीडा किल्ल्याला विचित्रगड किंवा बिनीचा किल्ला असे देखील संबोधले जाते.

इतिहास : या किल्ल्याची निर्मिती ही यादवकालीन आहे. या किल्ल्यावरील तीसऱ्या दरवाजावर असणाऱ्या शिलालेखावरून मुहम्मद आदिलशहाने ह्या गडाची दुरुस्ती केली असे अनुमान निघते. या शिलालेखावरून मे १६५६ नंतर हा किल्ला शिवाजी महाराजांनी बांदल देशमुखांकडून घेतला असे समजते. किल्ला घेण्यासाठी राजांना बांदल देशमुखांशी हातघाईची लढाई करावी लागली. यात कृष्णाजी बांदल मारला गेला. बाजीप्रभू देशपांडे बांदलाचे मुख्य कारभारी होते. लढाईतर बाजीप्रभू देशपांडे व इतर सहकाऱ्यांना स्वराज्यात सामील करून घेतले गेले. इ.स. १६६६ च्या पुरंदरच्या तहानुसार हा किल्ला मोघलांच्या स्वाधीन केला गेला. २४ जून१६७० रोजी शिवरायांनी किल्ला परत घेतला. कान्होजी यांच्याकडे भोरची पूर्ण तर रोहीडा किल्ल्याची निम्मी देशमुखी व जमिनीचे काही तुकडे इनाम होते. रोहीड्याचे गडकरी त्यांचेकडून ३० होन घेत होते. शिवाजी महाराजांच्या अधिकाऱ्यांनी शिवाजी महाराजांकडे विचारणा केली की ३० च होन का, शिवाजी महाराजांनी निर्णय दिला की, जेथे आपले चाकर असल्यामुळे पूर्वापार चालत आलेले द्रव्यच घ्यावे. पुढे किल्ला मोघलांनी जिंकला, मात्र भोरच्या पंत सचिवांनी औरंगजेबाशी झुंजून किल्ला स्वराज्यात पुन्हा दाखल केला. संस्थाने विलीन होईपर्यंत राजगड, तोरणा, तुंग आणि तिकोना किल्ल्याप्रमाणे हाही किल्ला भोरकरांकडे होता.

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे : पहिल्या दरवाज्याच्या चौकटीवर गणेशपट्टी आणि वर मिहराब आहे. पुढे १५ ते २० पायऱ्या पार केल्यावर दुसरा दरवाजा लागतो. येथून आत गेल्यावर समोरच पाण्याचे भुयारी टाके आहे. याचे पाणी बाराही महिने पुरते. येथून ५-७ पायऱ्या चढून गेल्यावर तिसरा दरवाजा लागतो. हा दरवाजा अतिशय भक्कम आहे. यावर बऱ्याच प्रमाणात कोरीव काम आढळते. दोनही बाजूंस हत्तीचे शिर कोरण्यात आले आहे. तसेच डाव्या बाजूला मराठी उजव्या बाजूला फारसी शिलालेख आहे. आजुबाजूच्या तटबंदीची पडझड झाली आहे. ह्या सर्व दरवाजांची रचना एकमेकांना काटकोनात आहे. येथून आत शिरल्यावर समोरच २ वास्तू दिसतात. एक गडावरील सदर असावी तर दुसरे किल्लेदाराचे घर असावे. डाव्या बाजूला थोडे अंतर चालून गेल्यावर रोहिडमल्ल उर्फ भैराबाचे मंदिर लागते. मंदिरासमोर लहानसे टाके, दीपमाळ व चौकोनी थडगी आहेत. देवळात गणपती, भैरव व भैरवी यांच्या मूर्ती आहेत. रोहीड्याचा घेर तसा लहानच आहे. किल्ल्याच्या आग्नेयस शिरवले बुरूज, पश्चिमेस पाटणे बुरूज व दामगुडे बुरूज, उत्तरेस वाघजाईचा बुरूज व पूर्वेस फत्ते बुरूज व सदरेचा बुरूज असे एकूण ६ बुरूज आहेत. गडाची तटबंदी व बुरुजांचे बांधकाम अजूनही मजबूत आहेत. गडाच्या उत्तरेकडील भागात टाक्यांची सलग रांग आहे. येथेच एक भूमिगत पाण्याचे टाके आहे. तेथेच मानवी मूर्ती व शिवपिंडी आहे. संपूर्ण गड फिरण्यास दीड तास पुरतो.

गडावर जाण्याच्या वाटा :

बाजारवाडी मार्गे : दक्षिणेस ८-१० किमी अंतरावर बाजारवाडी नावाचे गाव आहे. बाजारवाडीपर्यंत जाण्यासाठी एसटी सेवा उपलब्ध आहे. बाजारवाडीपासून वळलेली वाट गडाच्या पहिल्या दरवाजापाशी घेऊन जाते. वाट अत्यंत सोपी असून दरवाजापर्यंत पोहचण्यास एक तास लागतो. अंबवडे मार्गे भोर ते अंबवडे अशी एसटी सेवा उपलब्ध आहे. पुणे-भोर-पानवळ-अंबवडे अशी बससेवा देखील उपलब्ध आहे. या गाडीने अंबवडे गावी उतरून गावाच्या पूर्वेकडील दांडावरून गड चढण्यास सुरुवात करावी. ही वाट लांबची आणि निसरडी आहे. या वाटेने गड गाठण्यास सुमारे अडीच तास पुरतात. शक्यतो गडावर जाताना बाजारवाडी मार्गे जावे आणि उतरताना नाझरे किंवा अंबवडे मार्गे उतरावे. म्हणजे रायरेश्वराकडे जाण्यास सोपे जाते.

रोहीडा ते रायरेश्वर वाटा : १. भोर -कारी बसने कारी गावात उतरावे. तिथून लोहदरा मार्गे २ तासांत रायरेश्वर पठाराकडे पोहचतो व पठारावरील वस्ती पर्यंत जाण्यास दीड तास लागतो. २. वडतुंबी मार्गे – दुपारची (२.४५) भोर-टिटेघर गाडी आंबवण्यास येते. तिने वडातुंबी फाट्यावर उतरावे. तिथून १५ मिनिटांत वडातुंबी गाव गाठणे. येथून साधारणतः २ तासात गणेशदरा मार्गे रायरेश्वर पठारावर पोहचता येते. ३. भोर- कोर्लेगाडीने कोर्लेगावात उतरावे. रात्री उशीर झाल्यास गावात मुक्काम करून पहाटे गायदरा मार्गाने ३ तासात रायरेश्वर पठारावरील देवळात जाता येते. ४. भोर-दाबेकेघर बसने दाबेकेघरला उतरायचं व तिथून धानवली पर्यंत चालत जायंच. पुढे वाघदरामार्गे ३ तासात रायरेश्वर गाठायचं.

रोहीडमल्लच्या मंदिरात ५ ते ७ जणांची रहाण्याची सोय होते. पावसाळ्यात मात्र मंदिरात रहाता येत नाही. जेवणाची सोय आपण स्वतःच करावी. गडावर पिण्याचे पाणी बारमाही उपलब्ध आहे. गडावर जाण्यासाठी बाजारवाडी मार्गे – १ तास लागतो.

वासोटा किल्ला

वासोटा किल्ला Vasota Fort ४२६७ फूट उंचीचा हा किल्ला वनदुर्ग प्रकारातील आहे.
सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर कोयना डोंगररांगेतील हा किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने मध्यम समजला जातो.

काळ्या मातीच्या या महाराष्ट्रातील, कोयना नदीच्या खोऱ्यात, रानात वसलेला दुर्ग म्हणजे ‘किल्ले वासोटा’ ज्ञानेश्वरीत वासोट्याचा अर्थ ‘आश्रयस्थान’ असा दिला आहे. वासोट्यालाच ‘व्याघ्रगड’ असेही दुसरे नाव आहे. कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्राच्या दुर्गमतेमुळेच हा भाग वन्यजीवनाने समृद्ध बनला आहे.

इतिहास : वासोटा किल्ला प्राचीनत्वाचा शोध घेता आपल्याला वरिष्ठ ऋषींच्या काळापर्यंत मागे जावे लागेल असे मानले जाते की, वरिष्ठ ऋषींचा कोणी एक शिष्य, अगस्ती ऋषी यांनी विंध्य पर्वत ओलांडून दक्षिणेकडचा मार्ग शोधला. सह्याद्रीच्या कोयना काठच्या त्या शिखरावर राहण्यास आला व त्याने आपल्या निवासी डोंगराला आपल्या गुरूंचे नाव दिले. कालांतराने या देशीच्या क्षत्रियांनीत्या डोंगराला तटाबुरूजाचे साज चढवून लष्करी ठाणे केले. त्या डोंगराचे परंपरागत ‘वरिष्ठ’ हे नाव अपभ्रंश होऊन ‘वासोटा ’ झाले. प्रत्यक्ष उल्लेखित नसला तरीही, हा किल्ला शिलाहारकालीन असावा. शिलाहारांच्या किल्ल्यांच्या नामावलीत ‘वंसतगड’ या नावाने उल्लेखिलेला किल्ला हा वासोटा असावा. मराठी साम्राज्याच्या छोट्या बखरीवरून शिवरायांनी जावळी विजयानंतर वासोटा घेतला असे सांगितले जाते. पण ते खरे नाही. जावळी घेताना, जावळीतील तसेच कोकणातील इतर किल्ले शिवरायांनी घेतले पण वासोटा दूर सल्याने किल्लेदाराच्या हाती राहीला. अफझल वधानंतर काढलेल्या मोहिमेतही वासोटा वासोटा किल्ला येत नव्हता. पुढे शिवराय पन्हाळगडवर अडकलेले असताना, आपल्या मुखत्यारीत मावळातील पायदळ पाठवून त्यांनी वासोटा किल्ला दि. ६ जून १६६० रोजी घेतला. सन १६६१ मध्ये पकडलेल्या इंग्रज कैद्यांपैकी फॅरन व सॅम्युअल यांना वासोट्यावर कैदेत ठेवण्यात आले होते. पुढे १६७९ मध्ये वासोटा किल्ल्यावर २६,००० रुपये सापडले. पुढच्या काळात १७०६ मध्ये पंतप्रतिनिधींच्या उपपत्नी ताली तेलिणीने हा किल्ला आपल्या हातात घेतला. पुढीलवर्षी पेशव्यांचे सेनापती बापू गोखले यांनी ताई तेलिणी बरोबर लढाई केली. ताई तेलिणीने आठ-दहा महिने प्रखर झुंज देऊन किल्ला लढवला. १७३० मध्ये वासोटा किल्ला बापू गोखल्यांच्या हाती पडला.

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे : वासोटा किल्ल्यावर जाण्यासाठी दोन दरवाजे लागतात. यातील पहिला दरवाजा ढासळलेल्या अवस्थेत आहे. दरवाजाने गडावर प्रवेश करता येतो . समोरच मारुतीचं बिन छपराचं मंदिर आहे. मंदिरापासून प्रमुख तीन वाटा जातात. सरळ जाणाई वाटा किल्ल्यावरील भग्नावशेषांकडे घेऊन जाते. उजव्या बाजूस जाणारी वाट ‘काळकाईच्या ठाण्याकडे’ जाते. वाटेतच महादेवाचे सुंदर मंदिर लागते. मंदिरात दोन ते तीन जणांची राहण्याची सोय होऊ शकते. येथून पुढे जाणारी वाट माचीवर घेऊन जाते. या माचील पाहून लोहगडच्या विंचूकाठ्याची आठवण येते. याच माचीलाच काळकाईचे ठाणे म्हणतात. या माचीवरून दिसणारा आजुबाजूचा घनदाट झाडांनी व्यापलेला प्रदेश, चकदेव, रसाळ, सुमार, महिपतगड, कोयनेचा जलाशय हा संपूर्ण देखावा मोठा रमणीय आहे. मारुतीच्या देवळाच्या डावीकडे जाणारी वाट आपल्याला जोड टाक्यांपाशी घेऊन जाते. या टाक्यातील पाणी पिण्यासाठी योग्य आहे. पुढे ही वाटा जंगलात शिरते आणि बाबुकड्यापाशी येऊन पोहोचते. या कड्याचा आकार इंग्रजी ‘ण’ अक्षरा सारखा आहे. याला पाहून हरिश्चंद्रगडाच्या कोकणकड्याची आठवण येते. समोरच उभा असणारा आणि आपले लक्ष वेधून घेणारा उंच डोंगर म्हणजेच ‘जुना वासोटा’ होय.जुना वासोटा नव्या वासोट्याच्या बाबुकड्यावर उभे राहिल्यावर समोरच उभा असणारा डोंगर म्हणजे जुना वासोटा. आता या गडावर जाणारी वाटा अस्तित्वात नाही. तसेच पाण्याचीही तुटवडा आहे. घनदाट झाडे व वन्यश्वापदेही असल्याने सहसा येथे कोणी जात नाही.

गडावर जाण्याच्या वाटा :वासोटा किल्ल्यावर जाण्यासाठी दोन प्रमुख मार्ग आहेत. एक नागेश्वरमार्गे आणि दुसरा थेट वासोट्याकडे.

सातारामार्गे वासोटा :

१) कुसापूर मार्गे : साताऱ्याहून बामणोली या गावी यावे. सकाली ९ वाजता साताऱ्याहून बसची सोय आहे. येथून कुसापूरला कोयना धरणाचा जलाशय लॉंचने पार करून जाता येते. कुसापूरहून दाट जंगलात दोन वाटा जातात. उजवीकडे जाणारी वाट आठ मैलांवरील नागेश्वराकडे नेते तर डावीकडे जाणारी वाट वासोट्यावर घेऊन जाते.

२) खिरकंडी मार्गे : साताऱ्याहून बसने ‘वाघाली देवाची’ या गावी यावे, येथून लॉंचच्या सहाय्याने जलाशय पार करून खिरकंडी या गावी यावे. येथून धनगर वाडी पासून जाणारी वाट ‘मेट इंदवली’ या गावात घेऊन जाते. साताऱ्यापासून इथवरचा प्रवास आठ-नऊ तासांचा आहे. येथून पुढे पाच-सहा तासात वासोट्यावर जाता येते.

३) महाबळेश्वर मार्गे : महाबळेश्वरहून ‘तापोळे’ गावी येऊन लॉंचने कुसापूर गाठता येते, आणि तेथून वासोटा गाठावे. चिपळूणहून वासोटा १. चिपळूणहून स. ८.३० वाजताच्या बसने ‘चोरवणे’ या गावी यावे. येथून ५ ते ६ तासात वसोट्याला पोहोचता येते. य मार्गात वाटेत कुठेच पाणी नसल्यामुळे आपल्याकडे पाण्याचा भरपूर साठा घेऊन जावे. या वाटेने वर गेल्यावर एक पठार लागते. पठारावरून डावीकडे जाणारी वाट नागेश्वर कडे तर उजवीकडची वाट वासोट्याला जाते. येथे नागेश्वराकडे जाणाऱ्या वाटेने थोडे पुढे गेल्यावर खाली एक वाट जंगलात विहिरीकडे जाते. येथून वासोट्याचे अंतर दोन तासात कापता येते. २. चिपळूणहून ‘तिवरे’ या आवी यावे. येथून रेडे घाटाने वासोट्याला जाता येते.

नागेश्वर मार्गे वासोटा : नागेश्वराला भेट दिल्याशिवाय वासोट्याची भेट पूर्ण होऊच शकत नाही. वासोट्यावर जाताना समोरच एक सुळका आपले लक्ष वेधून घेतो. त्यालाच नागेश्वर म्हणता. या सुळक्याच्या पोटात एक गुहा आसून, तेथे महादेवाचे मंदिर आहे. हजारो, नागरिक दर शिवरात्रीला या पवित्र स्थानी दर्शनास येतात. गुहेच्या छतावरून बाराही महिने पाण्याच्या थेंबांचा अभिषेक शिवलिंगावर होत असतो. बहुतेक ट्रेकर्स प्रथम नागेश्वराचे दर्शन घेऊन मग वासोट्याला जातात. त्यासाठी फक्त लांबचा पल्ला चालण्याची तयारी असावी लागते.

पूर्वी उल्लेखिलेल्या नव्या वासोट्यावरील महादेवाच्या मंदिरात २ ते ३ जणांची राहण्याची सोय होते. नव्या वासोट्यावर जोड टाक्यांच्या शेजारील पठारावरही राहता येते. नागेश्वराची गुहा ही राहण्यासाठी उत्तम जागा आहे. येथे २० ते २५ जन आरामात राहू शकतात. जेवणाची सोय आपण स्वतःच करावी. नागेश्वराच्या गुहेकडे जातांना, पायऱ्यांच्या उजवीकडून जंगलात जाणाई वाट पाण्याच्या विहीरीपाशी घेऊन जाते जाते. नव्या वासोट्यावरही मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध आहे. उन्हाळ्यातही या विहिरीला पाणी असते. गडावर जाण्यासाठी कुसापूर मार्गे ४ तास व चोरवणे मार्गे ७ तास लागतात.

सूचना : वासोट्याला पावसाळ्यात जाताना जळवांचा मोठ्या प्रमाणावर त्रास होतो. तेव्हा आवश्यक ती काळजी घ्यावी. चिपळूणहून चोरवणे मार्गेवासोट्याला जाताना वाटेत पाण्याची कुठेही सोय नाही. तेव्हा पाण्याचा पुरेसा साठा जवळ बाळगणे आवश्यक आहे.

तोरणा किल्ला

तोरणा किल्ला Torana Fort – १४०० मीटर उंचीचा हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे.
पुणे जिल्ह्यातील पुणे डोंगररांगेतील हा किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने मध्यम समजला जातो.

शिवाजी महाराजांनी सुरुवातीच्या काळात जे काही किल्ले घेतले त्यापैकी एक किल्ला तोरणा. गडावर तोरण जातीची पुष्कळ झाडी असल्यामुळे गडाचे नाव पडले तोरणा. महाराजांनी गडाची पहाणी करतांना याच्या प्रचंड विस्तारामुळे याचे ‘प्रचंडगड’ असे नाव ठेवले.पुणे जिल्ह्याच्या वेल्हा तालुक्यातून गेलेल्या सह्याद्रीच्या रागेंतून दोन पदर निघून पूर्वेला पसरत गेलेले आहेत. यापैकी पहिल्या पदरावर तोरणा व राजगड वसलेले आहेत तर दुसऱ्या पदराला भुलेश्वर रांग म्हणतात. पुण्याच्या नैऋत्येस असलेल्या पर्वतराजीमध्ये उत्तर अक्षांश व पूर्व रेखांशावर हा किल्ला आहे. याच्या दक्षिणेला वेळवंडी नदी व उत्तरेला कानद नदीचे खोरे आहे. गडाच्या पश्चिमेला कानद खिंड, पूर्वेला बामण व खरीव खिंडी आहेत.

इतिहास : हा किल्ला कधी आणि कोणी बांधला याचा पुरावा आज उपलब्ध नाही. येथील लेण्यांच्या आणि मंदिरांच्या अवशेषांवरुन हा शैवपंथाचा आश्रम असावा. इ.स. १४७० ते १४८६ च्या दरम्यान बहमनी राजवटीसाठी मालिक अहमद याने हा किल्ला जिंकला. पुढे हा किल्ला निजामशाहीत गेला. नंतर तो महाराजांनी घेतला व याचे नाव प्रचंडगड ठेवले. गडावर काही इमारती बांधल्या. राजांनी आग्ऱ्याहून आल्यावर अनेक गडांचा जीर्णोद्धार केला. त्यात ५ हजार होन इतका खर्च त्यांनी तोरण्यावर केला. संभाजी महाराजांचा वध झाल्यावर हा किल्ला मोगलांकडे गेला. शंकराजी नारायण सचिवांनी तो परत मराठ्यांच्या ताब्यात आणला. पुढे इ.स. १७०४ मध्ये औरंगजेबाने याला वेढा घातला व लढाई करून आपल्या ताब्यात आणला व याचे नाव फुतुउल्गैब म्हणजे दैवी विजय ठेवले. पण परत चार वर्षांनी सरनोबत नागोजी कोकाटे यांनी गडावर लोक चढवून गड पुन्हा मराठ्यांच्या ताब्यात आणला व यानंतर तोरणा कायम स्वराज्यातच राहिला. पुरंदरच्या तहात जे किल्ले मोगलांना दिले त्यामध्ये तोरणा महारजांकडेच राहिला. विशेष म्हणजे औरंगजेब बादशहाने लढाई करून जिंकलेला असा हा मराठ्यांचा एकमेव किल्ला होय.

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे :

गडावर जाण्याच्या वाटा :

गडावरील मेंगाई देवीच्या मंदिरात १० ते १५ जणांची राहण्याची सोय होते. जेवणाची सोय आपण स्वतःच करावी. मेंगाई देवीच्या मंदिराच्या समोरच बारामही पाण्याचे टाके आहे. गडावर जाण्यासाठी अडीच तास वेल्हेमार्गे, ६ तास राजगड-तोरणा मार्गे लागतात.

सूचना : गडावर जाणारी वाट :- कठीण – राजगड -तोरणा मार्गे

सुमारगड किल्ला

सुमारगड किल्ला Sumargad Fort – २००० फूट उंचीचा हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे.
महाबळेश्वर जिल्ह्यातील महाबळेश्वर कोयना डोंगररांगेतील हा किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने कठीण समजला जातो.

सुमारगड हा नावाप्रमाणेच सुमार आहे. ‘उगवतीच्या कड्यावर एका झाडाला धरून वर येंगाव लागत. असा गोनीदांनी या किल्ल्याच्या बद्दलच्या वर्णनात म्हटलेले आहे. रसाळगड आणि महिपतगड यांच्या बरोबर मध्ये हा किल्ला येतो. आजुबाजूला असणारे जंगल आणि किल्ल्यावर जाण्यासाठी असणारी अवघड वाट यामुळे किल्ला फारच दुर्लक्षित झालेला आहे.

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे : किल्ल्यावर पोहचल्यावर समोरच पाण्याची दोन टाकी आहेत. टाक्यांच्या पोटातच एक गुहा आहे. यात शिवाची पिंड आणि देवीची मूर्ती आहे. पाण्याच्या टाक्यांच्या उजव्या अंगास थोडे वर गेल्यावर एकखांबी पाण्याचे टाके लागते. एक वाट समोरच्या टेकाडावर जाते तर एक टेकाडाला वळसा घालून पुन्हा टाक्यांपाशी येते. समोरच्या टेकडीला वळसा मारताना एका ठिकाणी दगडमातीने बुजलेली गुहा दिसते. या गुहेत दोन खोल्या आहेत. मात्र यात बऱ्याच मोठ्या प्रमाणावर माती जमा झालेली आहे. गडमाथा फारच लहान असल्यामुळे गडफेरीस अर्धा तास पुरतो.

गडावर जाण्याचा वाटा : सुमारगडावर जाण्यासाठी एकच वाट आहे. ही वाट एका खिंडीतून वर जाते. या दोन्ही वाटा एक खिंडीतच येऊन मिळतात. महिपत गडावरून वाडीबेलदार या गावात न उतरता उलट्या दिशेने खाली उतरावे. वाटेत धनगराची दोन तीन घर लागतात. येथून थोडे खाली उतरल्यावर एक ओढा लागतो तो पार करून समोरचा डोंगर चढावा. पुढे अर्ध्या तासातच आपण एका खिंडीपाशी पोहचतो. खिंडीतून डावीकडे वर चढणारी वाट थेट सुमारगडावर घेऊन जाते. या वाटेने पुढे गेल्यावर थोड्याच वेळात आपण एका कड्यापाशी पोहचतो. कड्याला लागूनच वाट पुढे जाते पुढची वाट अवघड आहे. जवळ रोप असल्यास फारच उत्तम, खिंडीपासून किल्ल्यावर जाण्यास पाऊण तास पुरतो. रसाळगडावरून सुमारगडाकडे यायचे झाल्यास वाटेत एक राया धनगराचा झाप लागतो. मात्र रसाळगड ते सुमारगड हे अंतर साडेचार तासाचे आहे.

गडावर राहण्याची सोय नाही. जेवणाची सोय नाही. पाण्याची सोय बारामही उपलब्ध आहे. गडावर जाण्यासाठी महिपतगडामार्गे अडीच तास लागतात.