Wednesday, 29 June 2016

मुंबईजवळचे टॉप 10 'पिकनिक स्पॉट'
1. भिवपुरी : माथेरानच्या कुशीत असलेलं हे ठिकाण मुंबईपासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे. भिवपुरी रेल्वे स्टेशनजवळ पर्यटकांसाठी हॉटेल्स देखील आहेत. येथे गावकर्‍यांना सांगितल्यास ते जेवणाची उत्तम सोय देखील करतात. भिवपुरीला धबधब्याचा आनंद घेण्यासाठी दरवर्षी येथे भरपूर पर्यटक गर्दी करतात.
2. चिंचोटी : येथे पोहोचण्यासाठी हिरव्या झाडाझुडपाच्या दाटीतून जावं लागतं. या मार्गावर ठिकठिकाणी धबधबे पाहायला मिळतात. मुख्य धबधब्याजवळ पोहचायला सुमारे तासभर चालावं लागतं. दहिसर टोलनाक्यानंतर कामन जंक्शनजवळ हे ठिकाण आहे. ट्रेनने जायचं असेल तर नायगाव स्टेशनला उतरून रिक्षाने जाता येतं.
3. तुंगारेश्वर : नदी आणि धबधबा अशा दोन्ही ठिकाणचा आनंद येथे घेता येतो. मुंबईपासून सुमारे २ तासांच्या अंतरावर तुंगारेश्वर आहे. पर्यटकांसाठी डोंगरावर मात्र कोणतीही जेवणाची व्यवस्था नाही. त्यामुळे तुम्हाला स्वत:ची व्यवस्था करुनच जावं लागतं.
4. पांडवकडा : खारघर परिसरात पांडवकडा या धबधब्यावर गेल्या दहा वर्षांपासून मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील पर्यटक गर्दी करत असतात. पण हा धबधबा रिस्की आहे. त्यामुळे धबधब्यावर जाण्यास बंदी घातली आहे. पण अनेक पर्यटक पांडवकड्याला भेट देण्यासाठी येथे येतात. डोंगराने नेसलेला हिरवाकंच शालू पर्यटकांना भुरळ घालत असतो. हार्बर रेल्वे मार्गावरील खारघर स्टेशनवरून या ठिकाणी जाता येते. निसर्गाचं सुंदर रुप येथे पाहायला मिळतं.
5. झेनिथ : खोपोली शहरापासून २ किमीवर असलेल्या झेनिथ धबधब्याच्या पाण्याचा फोर्स खूप जास्त आहे. त्यामुळे येथे तरुणाईने स्वत:ला सांभाळावं. शनिवारी-रविवारी या धबधब्यावर मोठी गर्दी होते. येथे आजुबाजुला अनेक धाबे आहेत.
6. पळसदरी : मुंबई-पुणे महामार्गावरच्या चौक फाट्यापासून १८ किमी दूर आणि पळसदरी रेल्वे स्टेशनपासून दोन किमी अंतरावर पळसदरी धबधबा आहे. रेल्वेमार्गाचा पर्याय येथे आहे. मोठ्या प्रमाणात येथे पर्यटक गर्दी करतात.
जेवणाची सोय या ठिकाणी होते.
7. गाढेश्वर : पनवेल तालुक्यातील गाढेश्वर नदीकाठी पर्यटक गर्दी करतात. मनसोक्त डुंबण्यासाठी इच्छुक असणारे पर्यटक या ठिकाणी आवर्जून येतात.
8. गवळीदेव : नवी मुंबईतील घणसोली गावाजवळ असणारा गवळीदेव धबधबाही आसपासच्या पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र बनलं आहे. हा धबधबा आणि गवळीदेव डोंगर येथे मूलभूत सोयीसुविधांचा अभाव आहे त्यामुळे स्वत:ची पूर्ण व्यवस्था करुनच येथे जावे.
9. कोंडेश्वर : बदलापूरपासून 6 किलोमीटर अंतरावर कोंडेश्वर हा धबधबा आहे. येथे दोन धबधबे आहेत. बदलापूर पूर्वेकडून भोज-दहिवली शेअर रिक्षा उपलब्ध आहेत. कुंडात डोह असून त्यात कपार्‍या असल्याने येथे पाण्यात उतरताना पुरेशी खबरदारी घ्यावी लागते.
10. भगीरथ : वांगणी स्थानकापासून 4 किलोमीटर अंतरावर पर्यटकांचे प्रमुख आकर्षण ठरलेला भगीरथ धबधबा आहे. बेडीसगावापासून धबधब्याकडे जाण्यासाठी पायवाट आहे. या ठिकाणी जेवणाची सोय नाही.
‪#‎picnicplans‬ ‪#‎marathikhichadi‬

No comments:

Post a Comment